नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यात महसूल वर्ष 2024-25 मध्ये थकबाकीसह 5 कोटींपेक्षा अधिक महसूलची रक्कम वसूल होणे बाकी असून, संबंधित थकबाकीदारांनी थकबाकी तत्काळ भरावी अन्यथा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करून तिच्या विक्रीतून रक्कम वसूल करण्यात येईल, अशी कडक सूचना तहसिलदार डॉ. जी. व्ही.एस. पवनदत्ता यांनी दिली आहे.
तहसिल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, चालू मागणी व थकबाकी असे मिळून सुमारे 1 कोटी तर अंतर्गत लेखा परीक्षणानुसार 4 कोटींच्या आसपासची अशी सुमारे 5 कोटींपेक्षा अधिकची वसूली प्रलंबित आहे. महसूल वसुली अंतर्गत करमणूक कर, अकृषिक आकारणी, गौण खनिज शिल्लक वसुली, हॉटेल परवानाधारक वसुली आणि मोबाइल टॉवर कंपन्यांच्या थकबाकीदारांनी रक्कम त्वरित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या कार्यालयात जमा करावी.
थकबाकीदारांनी या संदर्भात नोटीस मिळाल्यानंतर 7 दिवसांत थकबाकी भरावी. नोटीस प्राप्त न झाल्यास ती तलाठ्यांकडून प्राप्त घेणे आवश्यक आहे. थकबाकी न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 179 नुसार मालमत्ता अटकावून जप्तीची कारवाई केली जाईल. पुढील टप्प्यात या मालमत्तेची विक्री करून रक्कम शासनात जमा केली जाईल
थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत वसूली रक्कम भरून कारवाई टाळावी, अन्यथा कठोर उपाययोजना करण्याशिवाय शासनास पर्याय उरणार नाही, सर्व संबंधितांनी याची नोंद घेऊन तत्काळ थकबाकी भरावी, असे आवाहन तहसिलदार डॉ. जी.व्ही. एस. पवनदत्ता यांच्या वतीने करण्यात आले आहे.