नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन २०२१-२०२२ करीता मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
मधकेंद्र योजना सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येईल व ५० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यासोबत मधमाशा संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण व जनजागृती मंडळामार्फत करण्यात येते.
वैयक्तिक मधपाळ योजनेसाठी ५० टक्के स्वगुतंवणूक रक्कम जिल्हा कार्यालयास भरणा केल्यावर १० दिवसाचे मध उद्योगाचे प्रशिक्षण देवून एका लाभार्थ्यांला १० मधपेट्या वसाहतीसह व इतर मध उद्योग साहित्य मागणी पुरवठा करण्यात येईल. वैयक्तिक मधपाळसाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजनेसाठी ५० टक्के स्वगुतंवणूक रक्कम जिल्हा कार्यालयास भरणा केल्यावर २० दिवसाचे मध उद्योगाचे प्रशिक्षण मध संचालनालय, महाबळेश्वर येथे घेतल्यानंतर एका लाभार्थ्यांला ५० मधपेट्या वसाहतीसह व इतर मधउद्योग साहित्य मागणी पुरवठा करण्यात येईल. यासाठी केंद्र चालक प्रगतीशील मधपाळासाठी संस्था, व्यक्तिंना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार किमान १० वी पास असावा आणि वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्र चालक मधपाळसंस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा भाडे तत्वावर १००० चौ.फुट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावे.
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे आणि मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधीताना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला रुम नं २२२, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड,नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१००५३,९४२१२३६८८४ ) येथे संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर.एल.चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.








