नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संसद रत्न डॉक्टर हिना गावित या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील प्रत्येक भागात गाव पाड्यात जाऊन प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत. त्या अंतर्गत आज 15 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी एकच दमात तब्बल 18 गावांमधून जोरदार प्रचार फेरी काढून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला.
डीजे च्या तालावर थिरकणारी तरुणाई, ढोल ताशांचे पथक, मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसाद हे या रॅलीचे मोठे वैशिष्ट्य ठरले. अक्कलकुवा, खटवाणी, ब्रिटिश अंकुश विहीर, अंबाबारी, नवा नागरमुथा, खापर, मोहपाडाफाटा, देव मोगरा माता मंदिर, नवापाडा, गव्हाळी, काकड्या आंबा, तलांबा, रामपूर, शेंदवाण, मोरांबा, रोजकुंड, महू पाडा, काकरकुंड, मोगरा पाणी, देव मोगरा पुनर्वसन या गावांचा यात समावेश होता. नागेश दादा पाडवी, यशवंत पावरा, सुभाष पावरा, शिवाजी पराडके, प्रताप वाळवी यांच्यासह तोरणमाळ, धडगाव, मोलगी, रोषमाळ, अक्कलकुवा, खापर या सर्व भागातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.
दरम्यान, शुक्रवार रोजी भगदरी, काकडीआंबा, कात्री, कात्री घाट, खंबारा, खुंटामोडी, कुंदलवड, पौला आणि अन्य गावांमधून डॉक्टर हिना गावित यांच्या कॉर्नर सभा पार पडल्या. दरम्यान, कॉर्नर सभांमधील भाषणातून त्यांनी सांगितले की, वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहणारा अक्कलकुवा धडगाव चा दुर्गम भाग प्रगतीच्या प्रमुख प्रवाहात आणायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी पुन्हा एकदा त्याच विश्वासाने शेगडीच्या चिन्हावर शिक्का मारून मला संधी द्यावी.
आपण सर्व मतदारांनी दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिल्याने नंदुरबार जिल्ह्यातील पहिली महिला खासदार बनवण्याचे सौभाग्य लाभले. त्या दहा वर्षात एक महिला म्हणून या दुर्गम भागातील समस्त महिलांच्या व्यथा, वेदना, समस्या सोडवण्यालाच प्राधान्य दिले आणि अक्कलकुवा धडगाव तालुक्यात विक्रमी स्वरूपात गॅस वाटप केले, महिलांना लक्षात घेऊनच आरोग्य केंद्र आणि वीज, पाणी संदर्भात उपाययोजना केल्या. रस्ते विकास केला, अस्तंबा आणि सावऱ्या दिगर तोरणमाळ सारख्या दुर्गम भागाला पूल, काँक्रीट रस्ते मिळवून दिले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर याच प्रकारे गतिमान विकास केला जाईल आणि हा भाग विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणून दाखवेन असे डॉक्टर हिना गावित म्हणाल्या.