नंदुरबार l प्रतिनिधी
खासदारकीच्या दहा वर्षात जास्तीत जास्त विकासकामे करुन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. येत्या कालावधीत दुर्गम भागातील विकासाचा अनुशेष भरुन काढणार असून आमचूर, महु उत्पादकांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार डॉ.हिना गावित यांनी केले.
अक्कलकुवा-धडगाव तालुक्यातील विविध गाव, पाड्यांमधील मतदारांशी डॉ.हिना गावित संवाद साधत आहेत.मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत.काल दुर्गम भागात काढण्यात आलेल्या मतदार संवाद यात्रेदरम्यान डॉ.हिना गावित म्हणाल्या की, अक्कलकुवा, धडगावमध्ये गेल्या अनेक वर्षात येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकल्या नाहीत.मात्र, येत्या कालावधीत या भागातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
आमचूर, महू, भगर उत्पादकांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध झाली तर आदिवासी बांधवांना स्थलांतर करावे लागणार नाही, असा विश्वास डॉ.हिना गावितांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळात आरोग्य केंद्र आणि वीज, पाणी संदर्भात योजना केल्या. नेटवर्कची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. या भागाची भौगोलिक परिस्थिती विकासात आव्हानात्मक असली तरी अशक्य काहीही नसून आपण पाच वर्षात परिसराचा कायापालट करणारच, असा ध्यास घेतल्याचे हिना गावित म्हणाल्या.