नंदुरबार l प्रतिनिधी-
स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आतापर्यंत अनेक नेते घडून गेले परंतु बेरोजगारी, कुपोषण, अनारोग्य, दारिद्र्य गरिबी याने ग्रासलेल्या इथल्या वंचित समूहाचा कोणताही विकास झालेला नव्हता. परंतु तीस वर्षांपूर्वी राजकारणात आल्यानंतर सर्वप्रथम नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आणून मी विकासाला गती दिली. विविध प्रकारचे पाणी प्रकल्प पूर्णत्वास आणले प्रत्येक गावासाठी रस्ते पाणी विज देण्याबरोबरच शेती विकास करणाऱ्या योजना राबवल्या. केवळ विकासाचा दृष्टिकोन असलेला उमेदवार आपण निवडून दिला म्हणून हे घडले. आताही सर्व मतदारांनी विकास कार्य गतिमान ठेवण्यासाठी जाती धर्मावर आधारित दिल्या जाणाऱ्या भुलथापांना बळी न पडता मतदान करावे; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात भेट देऊन संवाद करणारा झंजावाती दौरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत नंदुरबार विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या शहादा तालुक्यातील वैजाली, करणखेडा, नांदर्डे, सोनवल त.बो., कलमाडी, ठेंगचे, तहऱ्हाडी त.बो., वर्धे, परि, कोटली, औरंगपूर, कलसाडी, वाघोदा, काथर्दे दिगर, काथर्दे पुनर्वसन, काथर्दे खुर्द या गावांमध्ये संपर्क दौरा करीत कॉर्नर सभा घेतल्या. त्या कॉर्नर सभांमधून त्यांनी मतदारांना संबोधित केले. ज्येष्ठ नेते दीपक बापू पाटिल,जि.प.बांधकाम सभापती सौ.हेमलता शितोळे,भाजपा ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया,प्रकाशा मंडळाध्यक्ष विजय पाटिल,भगवान पाटिल,धनराज पाटील,युवराज पाटिल यांच्यासह परिसरातील सर्व गावांचे सरपंच,उपसरपंच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाषणात पुढे ते म्हणाले की, या दरम्यान झालेल्या भाषणांमधून त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत झाला. दुर्दैवाने लोकांनी घाबरून त्यावेळेला चुकीचे मतदान केलं पण आता ते सावध झालेत. मी जो काही विकास करतोय त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. जवळजवळ 30 वर्षापासून सातत्याने जनता मला विश्वासाने निवडून देते आहे. या पुढच्या काळामध्ये मतदार फसणार नाही. काँग्रेसच्या भूलथापांना फसायचे नाही, ही भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे जे मागच्या काळामध्ये झालं ते होणार नाही आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की, आम्ही विकासावर मत मागत असल्यामुळे निश्चितपणाने कुठल्याही पक्षाचा कोणीही उमेदवार विरोधात उभा राहिला तरी विजय आमचाच होईल.