नंदुरबार l प्रतिनिधी-
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्रीमती डॉ. सेठी यांनी म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकी कार्यालये, शासकीय विश्रामगृहे, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्ती, संघटना, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे