नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना नंदुरबार विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे नंदुरबार तालुक्यात सह जिल्हाभरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधून मोठा आनंद व्यक्त करण्याबरोबरच जल्लोष केला जात आहे. ‘पुन्हा एकदा डॉक्टर गावित साहेबच’ अशा शब्दात डॉक्टर गावित हेच निवडून येतील असा विश्वास आतापासून कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
डॉक्टर विजयकुमार गावित यांनाच भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी दिली जाईल हा विश्वास पूर्वीपासून कार्यकर्त्यांना होता त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून बंगल्यावर त्यांना भेटणारयांची रीघ लागली होती. आज अधिकृतपणे पक्षाकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले. तीन दिवसापासून पार पडत असलेल्या बैठकांमधून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असा आदेश आधीच दिलेला असल्यामुळे प्रत्येक गावातील डॉक्टर गावित समर्थक कार्यरत झालेले आहेत.
थोडक्यात राजकीय वाटचाल
डॉक्टर विजयकुमार गावित हे आजच्या स्थितीत महाराष्ट्रातील मान्यवर नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते असून दुर्लक्षित आदिवासी समूहाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्यामुळे राज्यस्तरावर त्यांचे निराळे प्रस्थ निर्माण झाले आहे. 1994 च्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना बाद करून नंदुरबार विधानसभा मतदारसंघात ते पहिल्यांदाच अपक्ष निवडून आले होते. पहिल्या टर्म ला भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहयोगी आमदार म्हणून ते सहभागी झाले आणि लगेचच त्यांना आरोग्य राज्यमंत्रीपद मिळाले. तेव्हापासून आतापर्यंतच्या कार्यकाळात ते सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले तसेच उच्च शिक्षण व तंत्रज्ञान, आरोग्य, समाज कल्याण अशा विविध विभागाची राज्यमंत्री पदे त्यांनी भूषविली तथापि आदिवासी विकास मंत्री म्हणून 1999 ते 2014 आणि विद्यमान सरकारमधील अडीच वर्षे केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. गरीब दुर्लक्षित घटकांच्या प्रगतीसाठी त्यांनी लागू केलेल्या विविध लाभाच्या योजनांमुळे जनतेमध्ये ते कायम चर्चेत राहिले.
दरम्यान 2014 यावर्षी भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला होता. तेव्हापासून ते भारतीय जनता पार्टीतच कार्यरत आहेत. भारतीय जनता पार्टीतील हुकमी एक्का म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सातव्यांदा ते उमेदवारी करणार आहेत. तुल्यबळ विरोधी उमेदवार अद्याप तरी रिंगणात दिसत नसल्यामुळे त्यांची निवडणूक आव्हानात्मक नसल्याचे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.








