नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथे एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला दुसऱ्या प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या परिवाराने घरासमोर रस्त्यावर अडवून केली बेदम मारहाण सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मारहाणीत एकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निल परमेश्वर अग्रवाल हे आपल्या धान्य दुकानावरून मोटारसायकलने मशीद जवळील रस्त्याने घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल यांनी स्वप्निल परमेश्वर अग्रवाल याची रस्त्यावर मोटारसायकल अडवुन शर्टाची कॉलर पकडुन खाली पाडुन तोंडावर, पाठीवर मारहाण केली तसेच नयन संदीप अग्रवाल, दिपा संदीप अग्रवाल व रोनक संदीप अग्रवाल यांनी स्वप्नील अग्रवाल यास घेरुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेल्या विटाच्या तुकड्यानी चेहऱ्यावर व नाकावर मारहाण करीत गंभीर दुखापत केली.
विसरवाडी येथील स्वप्नील अग्रवाल या व्यापाऱ्याने विसरवाडी शिवारातील जमिन विकत घेतली परंतु सदर जमिन ही संशयित आरोपी संदिप अग्रवाल यास विकत घ्यायची होती त्याचा राग आल्याने स्वप्नील अग्रवाल यास मारहाण केल्याची फिर्याद नोंदविली आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले असून आरोपींचा कारवाई करण्यासाठी शोध सुरू आहे.