नंदुरबार l प्रतिनिधी-
जंगल जमीन आणि पाणी याचे रक्षण करणारा आदिवासी संघटित व्हावा त्याला उभे करावे या हेतूने जागतिक आदिवासी दिवस जगभरात साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने सुद्धा हेच हेतू साध्य करण्यासाठी आदिवासी विकासाच्या विविध योजना आणून शिक्षण रोजगार आणि अर्थसहाय्य देत आदिवासींना उभे करण्याचे कार्य चालवले आहे. दर्जेदार शिक्षण मिळावे प्रत्येकाला रोजगार मिळावा आणि गरिबांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही कायमच दक्षता घेतली आहे; असं सांगतानाच महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दुफळी, भुलथापा यांना बळी पडू नका. त्यामुळे समाजात फूट पडते आणि दुभंगलेल्या समाजाला कधीही न्याय मिळत नाही आणि म्हणून कायम संघटित रहा. आपल्या जीवनाचा विकास कशात आहे आणि नुकसान कशामुळे होणार आहे बघा; असे आवाहन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट 2024 भव्य सोहळा आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला. त्या प्रमुख सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी हे आवाहन केले.
नेहरु पुतळया जवळील पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात पारंपारिक आदिवासी कला आणि संस्कृतीचे भव्य प्रदर्शन घडवणाऱ्या नृत्य प्रकारांचे महाराष्ट्रातील आमंत्रीत गटाद्वारे सादरीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉ हिना गावीत, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ता डॉ. कांतीलाल टाटीया, आदिवासी पुरस्कार प्राप्त समाज कार्यकर्ते रूपसिंग पावरा, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीम. नयना गुंडे, शबरी आदिवासी व वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीम.लिना बनसोड, भा.प्र.से , संदिप गोलाईत, अपर आयुक्त, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे नंदुरबार येथील अधिकारी चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्प अधिकारी नतिशा माथुरमाथुर हे व्यासपीठावर उपस्थित होते. आदिवासी विभगाच्या अधिकाऱ्यांद्वारे या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्याआधी आदिवासी जननायक विरसा मुडां आणि आदिवासी समाजातील क्रांतिकारक यांना श्रध्दा सुमने व मानवंदना दिल्यानंतर दिप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीम. नयना गुंडे यांनी केले.
*शिष्यवृत्ती पोर्टलचे उद्घाटन व अनावरण*
या कार्यक्रमात प्रथम जागतिक आदिवासी दिनाची सुरवात डिजीटल उद्घाटनाने करण्यात आली. महाराष्ट्रातील आदिवासींना समर्पित गौरव गीत प्रकाशन आणि बोलीभाषा पाठ्यपुस्तकाचे अनावरण या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे त्याचबरोबर परदेश शिष्यवृत्ती पोर्टलचे उद्घाटन व अनावरण देखील या प्रसंगी करण्यात आले. शिष्यवृत्ती योजना माहिती, प्रकल्प कार्यालय, चंद्रपुर यांचे उपक्रम” सन्मान आदिवासी पुरूषांचा” तसेच शवरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांचे शेती उत्पन्न आधारित प्रक्रिया उद्योगावरील माहितीपट दाखवण्यात आले. शबरी विकास महामंडळाच्या अंतर्गत 5 ग्रामसंभाना तसेच एकलव्य कुशल योजनेतंर्गत निवड झालेल्या 15 प्रशिक्षण संस्थाच्या सामंजस्य कराराचे वितरण करण्यात आले.
दरम्यान मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित भाषणात पुढे म्हणाले, शिक्षणा शिवाय पर्याय नाही हे ओळखून आदिवासींच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास मंत्री या नात्याने मी कायम प्रभावी योजना देऊन आदिवासी विकासाला चालना दिली. आदिवासी शिकून मोठा व्हावा यासाठी आदिवासी मुलांच्या शिक्षणाला जे लागेल ते देतोय. सरकार मोफत सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. आश्रम शाळा, वसतिगृह काढले. स्वयंरोजगार दिले. डिजिटायझेशन च्या माध्यमातून जगात काय चाललय हे आता आदिवासी मुलांनाही कळणार आहे. शिक्षकांनाही शिस्त लागणार आहे. यासारख्या सुधारणा आम्ही सातत्याने करत असून आता तुम्हाला वैयक्तिक जिल्हा कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत धावपळ करायला लागू नये म्हणून पोर्टलची व्यवस्था केली आहे आपण त्या पोर्टल चे उद्घाटन केले आहे. स्थलांतर थांबावे म्हणून रोजगार दिले महिला बचत गट, वाहन, गृह उद्योग कर्ज दिले. मोठ्या प्रमाणात सिंचन व्हावे, शेती ला पाणी मिळून तुमचे उत्पन्न वाढावे यासाठी सिंचन योजना चांगल्या राबवल्या आहेत आता एकही गाव आणि एकही पाढा रस्त्याविना राहू नये म्हणून भगवान बिरसा रस्ते जोड योजना हाती घेतली आहे; अशी माहिती या प्रसंगी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.
*डॉक्टर हिना गावित यांचे भाषण*
याप्रसंगी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रमुख मार्गदर्शन पर भाषण करताना सांगितले की, आपली आदिवासी कला- संस्कृती अतिशय वेगळी आहे त्याचं वेगळेपण आजपर्यंत आपण जपत आलेलो आहोत. ती जपली तरच आपली आदिवासी संस्कृती ही टिकेल रुजेल आणि वाढणार आहे. आपली जी संस्कृती आहे यावरून आपली ओळख होते पण दुर्दैवानं असं बघतात मागच्या काळामध्ये आपल्या आदिवासींची संस्कृती कुठेतरी हळूहळू नष्ट होत चालली आहे आणि मला असं वाटतं आपल्या आदिवासींची संस्कृती जपायचं काम हे आपल्या प्रत्येक आदिवासी समाज बांधवाचं आहे. आपण आदिवासी आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे, असे स्पष्ट करून डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाल्या, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे संपूर्ण राजकारण आदिवासी विकास साधण्यासाठी जेवढे समर्पित राहिले तितकेच आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी सुद्धा वाहिलेलेवाहिलेले आहे. प्रत्येक वेळी मंत्री म्हणून निर्णय घेताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासींच्या कल्याणाचे आणि आदिवासी संस्कृतीला दृढ करणारे निर्णय केले.
*डॉक्टर सुप्रिया गावित यांचा संदेश*
प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आवाहन केले की, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे. आपल्या कला सादरीकरणात आदिवासी प्रथा परंपरा सांगणाऱ्या गोष्टी आल्या पाहिजे वेगवेगळ्या भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण वेगळे नसतो. आपण एकच आहेत, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे बोलताना डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितले की, या सोबतच आपल्यातले क्रीडा कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष केंद्रित करावे. जाती उपजाती आणि भाषेचे वैविध्य यावरून आपसात भेद करणे सोडा आणि संघटित व्हा, असा संदेश याप्रसंगी डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिला.
*सत्कार आणि पुरस्कार समारंभ*
या सोहळ्यात आदिवासी समाजातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांचा कलापथकांचा आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचा पुरस्कार देऊन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ हिनाताई गावित यांच्या हस्ते प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. पारंपारिक आदिवासी कला आणि संस्कृतीचे भव्य प्रदर्शन घडवणाऱ्या नृत्य प्रकारांचे महाराष्ट्रातील आमंत्रीत गटाद्वारे सादरीकरण करण्यात आले.
*लाभार्थ्यांना साहित्य वाटप*
न्युक्लीअस बजेट योजनेतंर्गत 33 लाभार्थ्यांना भजनी साहित्य किट वाटप, न्यूक्लीअस बजेट योजनेतंर्गत 17 लाभार्थ्यांना क्रिकेट साहित्य किट वाटप करण्यात आले. आदिवासी विभागाकडुन आभार प्रदर्शन संदिप गोलाईत, अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांनी प्रदर्शित केले. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे नंदुरबार येथील अधिकारी चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्प अधिकारी नतिशा माथुर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे निर्मल माळी उत्तम राठोड आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.