नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, बेरोजगार तरूणांसाठी कौशल्य विकासाच्या योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली आहे. तसेच मुलींच्या मोफत शिक्षणाचीही तरतूद केली आहे आणि सातत्याने लोकांना आम्ही हे लाभ पोहोचवत आलो आहे. सातत्याने लोकांच्या कल्याणाची विकासाची भूमिका पार पाडली; परंतु कोणत्या नेत्यांकडून आपल्याला किती योजना आणि लाभ मिळाले याची आठवण मतदारांनी देखील ठेवली पाहिजे. तुम्हाला भूल थापा देणाऱ्या आमच्या विरोधकांनी कधी तुम्हाला इतके लाभ दिले आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर शरसंधान केले.
महिन्याला साडेआठ हजार रुपये मिळवून देऊ असं खोटं सांगून काही ठिकाणी तर फॉर्म भरून घेण्यात आले आम्ही तसली फसवणूक कधी केली नाही खरोखर चे लाभ लोकांना दिले. सलग तीस-पस्तीस वर्ष निवडून येत असलेल्या आमच्या विरोधी नेत्यांनी कधी असा लाभ दिला आहे का? असाही प्रश्न आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थित केला.
ते शहादा तालुक्यातील सोनवद, कवठळ, कहाटूळ, लोंढरे, उजळोद, बोराळे, जयनगर, धांद्रे व कोंढावळ येथील विविध विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, शहादा पंचायत समितीचे सभापती विरसिंग ठाकरे, रमण्णाबाई पाटील, पानेश्वर पाटील, विनोद पाटील, भगवान पाटील, उद्धव पाटील, मनोज चौधरी, रोजेंद्र वाघ, सुनिल पाटील, नाना निकम, विजय पाटील, रोहिदास चौधरी यांच्यासह सर्व गावांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, बेरोजगार तरूणांसाठी कौशल्य विकासाच्या योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली आहे. तसेच मुलींच्या मोफत शिक्षणाचीही तरतूद केली आहे. राज्यातील, जिल्ह्यातील, गावातील अथवा शहरातील एकही नागरीक विकासपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासनाने घेतली आहे. प्रत्येकाचा सर्वांगीण विकास हाच या योजनांमागील हेतू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” या नावाने योजना सुरू केली आहे, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. यासाठी त्यांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना” आता घोषित केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.