नंदुरबार l प्रतिनिधी-
नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी ग्रस्त भागात खासदार ऍड गोवाल पाडवी तसेच आमदार शिरीषकुमार नाईक यांनी शनिवारी दिवसभर संयुक्त पाहणी दौरा केला. भरपावसात त्यांनी शेतीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे खासदार पाडवी यांनी आदेश दिले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासित केले.
नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान झाले असून नवापूर तालुक्यात एकाच दिवसात 211 मिलिमीटर पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे पिके वाहून गेल्याचे समोर आले आहे.नुकसान ग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी करत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून यासंदर्भात नवापूर तालुक्यातील महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत या पाहणी दौऱ्यात नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच मतदारसंघातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळाल्या बरोबर लोकसभेचे अधिवेशन सोडून पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आल्याची माहिती खासदार गोवाल पाडवी यांनी दिली.
नवापूर शहरातील इंदिरा नगर, दाऊल एहसान परिसर, तसेच कोळदा येथील रेल्वे ट्रॅक, नावागाव येथिल आश्रम शाळा, के टी वेअर बंधारा, नाले, शेती, नुकसानग्रस्त झालेली घरे, दुकानें आदींची पाहणी केली.
नवापूर शहरात महामार्गांचे चौपदरीकरण करताना काही तांत्रिक चुका समोर आल्या असून त्या त्रुटी सुधारण्याचे अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. जेसीबी च्या साहाय्याने गाळ बाजूला करून नाले सफाईचे आदेश देण्यात आले. दिल्ली सोडून अतिवृष्टीधारकाना भेटण्यासाठी नवनिर्वाचित खासदार ऍड गोवाल पाडवी हे आल्याने अनेकांनी त्यांच्या संवेदनशील स्वभावाचे कौतुक केले.केल पाडा गावात जवळपास वीस घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले.तसेच पूल पूर्ण तुटला आहे.
तो दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच चिंचपाडा गावात जाऊन खासदार ऍड पाडवी ,आ नाईक यांनी पाहणी केली.तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करून मदतीचे आवाहन केले. गरीब परिवाला तात्पुरती मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.दिलीप नाईक, आरिफभाई बॅलेंसरिया, दामू बिऱ्हाडे, गोटू पाटील आदिनी शहराच्या पाहणी दौऱ्यात सहभाग नोंदवला.