नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा होमगार्ड कार्यालयातील रिक्त जागांच्या भरतीसाठी होमगार्ड सदस्य नोंदणी सुरु असून जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा समादेश होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नंदुरबार जिल्हा होमगार्ड कार्यालयातील रिक्त जागा भरण्यासाठी होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन करण्यात आले असून 26 जुलै 2024 ते 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटी याबाबतची विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारिरीक क्षमता, मैदानी चाचणी याची तारीख जाहीर करण्यात येईल.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा (तळोदा पथकाअंतर्गत धडगाव) अक्कलकुंवा व नवापुर (नवापूर महिला वगळून) या पथकामधील पुरुष/महिला होमगार्डची नवीन सदस्य नोंदणी सुरु असून नोंदणीसाठी पात्रतेचे निकष याप्रमाणे असतील. पथकातील पोलीस स्टेशनअंतर्गत रहिवासी पुरावा म्हणुन मतदान कार्ड/आधारकार्ड, शिक्षण कमीत कमी 10 उत्तीर्ण, वय 20 ते 50 वर्षे, उंची पुरुषासाठी 162 से.मी. व महिलांसाठी 150 से.मी. पुरुषांकरीता छाती न फुगविता 76 से.मी. कमीत कमी 5 से.मी. फुगवणे आवश्यक तसेच संबंधीत पुरुष/महिला उमेवारास विहित वेळेत धावणे व गोळाफेक याची शारिरीक चाचणी द्यावी लागेल.
उमेदवार हे इतर कार्यालयात वेतनी सेवेत किंवा खाजगी सेवेत काम करत असल्यास कार्यालयप्रमुखाचे किवा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक, माजी सैनिक अथवा एनसीसी ‘बी’ व ‘सी’ प्रमाणपत्रधारक व इतर अन्य तपशिलाच्या पृष्ट्यर्थ सर्व संबंधित प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. उमेदवारास नोंदणीच्यावेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्या वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. उमेदवाराची निवड पुर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.
होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावे असेही जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक, श्री. तांबे, यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.