नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील मंगळ बाजार परिसरात बंद रुममध्ये क्रीडा मंडळाच्या परवान्याच्या गैरवापर करत दोन ठिकाणी सुुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर एलसीबीच्या पथकाने धाडी टाकत कारवाई केली आहे. दोन्ही ठिकाणाहून जुगाराच्या साहित्यासह रोकड असा सुमारे १ हजार ४२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादींमध्ये ३० संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार श्रवण दत्त एस. यांनी घेतल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंदे बंद आहेत. असे असले तरी अनेकजण चोरीछुपे जुगार खेळतांना किंवा खेळवितांना आढळून येतात. शहरातील मंगळ बाजार परिसरातील बंद रुम्समध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाली. श्री.खेडकर यांनी पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली (दि.२०) रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पथक रवाना केले.
मिळालेल्या माहितीनूसार, जुगार अड्ड्यांवर धाड टाकली असता तेथे १५ ते २० जण जुगार खेळतांना व खेळवितांना आढळून आले. पोलिस आल्याचे समजताच काही जणांनी पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी जुगार अड्ड्यावरुन १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये शरद उर्फ गोटू भिवसन चौधरी (वय ५०, रा.तांबोळी गल्ली, नंदुरबार), सत्तार रमजान मोमीन (वय ६०, रा.बागवान गल्ली, नंदुरबार), फारुख शाह रोशन शहा (वय ३६), कैलास कुशाभाऊ गवळी (वय ४०), शेख अरशद अयुब खाटीक (वय ३५), पिंजारी मोहंमद जाबीर मोहंमद नईम (वय ३९), सुनिल छोटूसिंग परदेशी (वय ५८), शिवाजी दगा बेडसे (वय ५०), दुर्गेश गोकुळदास वैष्णव (वय ५२), संदिप अरुण चौधरी (वय ३४), संदिप अनिरुद्ध पेंढारकर (वय ३५), ईश्वर पुंडलिक सुरवाडे (वय ३५), जितेंद्र मोतीराम चौधरी (वय ३५) व शेख हासीम यूसूफ पिंजारी (वय ३०, सर्व रा.नंदुरबार) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पत्त्याच्या कॅट, रोख रोकड, विविध कंपनींचे मोबाईल असा सुमारे ५६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोशि. अभय राजपूत यांनी फिर्याद दिली आहे.
तर दुसऱ्या गुन्ह्यात पोना.राकेश मोरे यांनी फिर्याद दिली असून १५ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये किशोर तेजूमल दादलाणी स्वत:च्या फायद्यासाठी गोल्डन क्रीडा मंडळाच्या परवान्याच्या गैरवापर करुन २७ पत्यांचा जुगाराचा खेळ खेळवितांना आढळून आला. तसेच मनोज बाळकृष्ण दर्वे, राजेश बन्सीलाल चौधरी, शाकीर युसूफ खाटीक, अरुण धर्मा वळवी, प्रकाश भगवान सोनवणे, राजेंद्र जयंतीलाल चव्हाण, महेश प्रभाकर चौधरी, प्रकाश जगन्नाथ महाजन, दिनानाथ महेश तिलंगे, मनोज गोरख चौधरी, जय गागनदास राजपाल, मोहंमद यासीन गुलाम निजामी, शक्ती शामलाल शिंदे हे १५ जण जुगार खेळत असल्याच्या संशयावरुन त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांकडून ८५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ४८ हजा ३५० रुपयांची रोकड व ३७ हजार १०० रुपयांचा इतर मुद्देमाल आहे.
शहरात अवैधधंदे बंद असतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार पोलिसांनी केलेल्या कारवाईने अवैधधंदे माफियांचे धाबे दणाणले आहे.