नंदुरबार l महेश पाटील
नंदुरबार शहरात 20 जुलै च्या रात्री नंदुरबार शहरात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने हुक्का पार्लरवर धाड टाकली. या पार्लरमधून बारा संशयतांना ताब्यात घेण्यात आले. नंदुरबार सारखे शहरात हुक्का पार्लर चालत असल्याची बातमीने शहरात एकच खळबळ उडाली. नंदुरबार जिल्ह्यात हुक्का पार्लरवर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील कोरीट नाका परिसरातील हॉटेल गजराज जवळ एका कार वॉशिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या दुकानात हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाल्याने नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने 20 जुलै रोजी रात्री 12. 30 वाजेच्या सुमारास हुक्का पार्लरवर धाड टाकली असता त्या ठिकाणी दहा ते बारा जण तंबाखू मिश्रित प्रतिबंधित हुक्का पीत असल्याचे पथकाला आढळून आले.पोलिसांनी घटनास्थळाहून हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे विविध काचेचे पॉट, रबरी नळ्या, चिनी मातीचे चिलम, चारकोल कोळश्याचे दोन बॉक्स, फॉइल पेपर यासह विविध तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
12 जणांना घेतले ताब्यात
याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेेषण शाखेचे पोशि. अभय राजपूत यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने यांचा व्यापार वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यावर निर्बंध अधिनियम २००३ चे कलम ४ (क), २१ (क), महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हुक्क्याचे साहित्य पुरविणारा अक्षय सतिष चौधरी रा.विमल विहार कॉलनी, नंदुरबार तसेच प्रतिक धमरसिंग नाईक रा.मोरंबा ता.अक्कलकुवा, राकेश दिलीप ठाकरे रा.फुलसरा ता.नंदुरबार् , निखील रमेशलाल गुरुबक्षाणी रा.जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार, रोहित सुनिल वालावाणी रा.वृंदावन कॉलनी नंदुरबार, अमन दिलीपकुमार बालाणी रा.नवी सिंधी कॉलनी नंदुरबार, पंकज मेघराजमल कुकरेजा रा.सिंधी कॉलनी, नंदुरबार, अमोल शामकुमा बक्षाणी रा.जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार, विक्की महेश बालाणी रा.बाबा गरीबदास नगर, नंदुरबार , योगेश कन्हैयालाल तेजवाणी रा.जुनी सिंधी कॉलनी या दहा जणांसह दोघे अल्पवयीन असे एकूण १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.








