नंदुरबार l प्रतिनिधी
समाजकंटक व गुंड यांना कायद्याचा कसलाही धाक राहिलेला नाही.धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात घडलेल्या घटनेने सामान्य जनता भयभीत झाली आहे. तऱ्हाडी गावाच्या अलीकडे दुचाकीने आलेल्या अज्ञात दोघांनी शिरपूर येथे महाविद्यालयात नोकरीस असलेले प्राध्याप आपल्या बहिणीला भेटून परत येत असताना गोळीबार केला. रात्रीच्या अंधारात हा थरार झाला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. जखमी प्रा.दिनेश पाटील यांना इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरू आहे.
जखमी प्रा.दिनेश रमेश पाटील (४२) हे मूळ शिरपूर तालुक्यात असलेल्या भरवाडे गावाचे रहिवासी आहेत. तेथे त्यांचा परिवार राहतो.शिरपूर येथे एस.पी.डी.एम.महाविद्यालयात प्रा.पाटील हे नोकरीस असल्याने त्यांचे वास्तव्य शिरपूर शहरातील श्रीकृष्ण कॉलनीत आहे. दि.९ जून रोजी प्रा.दिनेश पाटील हे त्यांची बहीण संगीता संजय पाटील (रा. सुलवाडे,ता.शहादा,जि.नंदुरबार) हिला भेटण्यास तिच्या गावी गेले होते. रात्री साडे आठ वाजता ते शिरपूर येथे परत येण्यास त्यांच्या दुचाकीने (क्रं.एम.एच.१८ए.डी.७३१०)निघाले.साधारण रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तऱ्हाडी गावाच्या अलीकडे दोन अज्ञात इसम त्यांच्या मागून दुचाकीने आले असल्याचे त्यांना दिसले. त्याचवेळी जोराचा आवाज झाल्याने मागे वळून पाहिले.त्याचबरोबर त्या दोघांनी त्यांची दुचाकीची दिशा वळविली. संशय आल्याने प्रा.पाटील यांनी डाव्या हाताने कंबरे जवळ हात लावून पाहिले असता जागा ओलसर झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दुचाकीच्या प्रकाशात पाहिले असता रक्त हाती लागले होते. गोळी लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तशाच अवस्थेत गाडी जलद गतीने तऱ्हाडी गावाच्या बस थांब्याजवल आणली. तेथे काही इसम बसले होते. त्यांना घटना सांगत डॉक्टरकडे घेऊन जाण्याची विनंती केली. त्यांनी गावातील एका डॉक्टरकडे नेले. त्यांनी शिरपूर येथे शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
प्रा. पाटील यांनी त्यांचा मित्र प्रशांत पाटील यास घटनेची माहिती दिली व शिरपूर येथे रुग्णालयात जाण्याचे सांगितले. त्याने गावातील एक व्यक्ती रिक्षाने शिरपुरला घेवून येईल असे सांगितले. त्याचवेळी भगिनीचा फोन आला. तिला घडलेली कहाणी सांगितली. तिने भरवाडे गावातील नातलग विश्वनाथ भानुदास पाटील व मनोहर पटेल यांना कळविले. ते तातडीने तऱ्हाडी फाट्यावर पोहचले. त्यांनी खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत त्यांनी पोलिसांना जबाब दिला असून अज्ञात दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. आपणास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली गेली असा त्यांचा संशय आहे. दरम्यान घटनेचा व्हिडिओ पाहिल्यावर हद्दीचा वाद मिटला. गोळीबार घटना झाल्याचे कळताच शिरपूर शहर व सारंगखेडा येथील पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळ गाठले.
परंतु कोणाच्या हद्दीत घटना घडली यावरून अधिकाऱ्यांचा रविवारी दुपारपर्यंत वाद सुरू होता. शहादा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, शिरपुर तालुका पोलिस प्रभारी जयपाल हिरे, सारंगखेडा उपनिरीक्षक किरण बाऱ्हे यांनी इंदिरा रुग्णालय गाठून जखमी प्रा.पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलेली माहिती, घटनेचा व्हिडिओ, फोटो हे पाहून हद्दीचा वाद दुपारी तीन वाजता मिटला. अखेरीस घटना सारंगखेडा हद्दीत घडली असल्याने तेथील पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.