नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथील जुल्फेकार तेली व लाखापूर येथील सागर पवार यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील साधारणतः चार हजार कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे यामुळे दोनही कुकुट पालन केंद्र चालवणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
बोरद येथिल जुल्फेकार तेली हे सन २०१४ पासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करीत आहेत.यामधून मिळणारे उत्पन्न तसेच शेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. त्याचप्रमाणे तुळाजा येथील सागर दिवाकर पवार यांनी देखील कुकुट पालनाचा व्यवसाय गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या गावी सुरू केला आहे.व्यवसाय सुरू करताना त्यांच्याकडे ५ हजार कोंबड्यांची बॅच होते हळूहळू त्यांची संख्या वाढली ही संख्या आता साधारणतः १० हजारापर्यंत पोहचली होती. आपला व्यवसाय ते नियोजित पणे चालवीत असतात.
परंतु गेल्या काही दिवसापासून उष्णतेमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे बोरद येथील जुल्फेकार तेली यांच्या कुकुट पालन केंद्रातील १२०० कोंबड्यांचा उष्णतेमुळे बळी गेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलग कोंबड्या मरत असल्याने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
त्याचप्रमाणे लाखापुर येथील सागर दिवाकर पवार यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील २ ते ३ हजार कोंबड्यांचा तापमान वाढीमुळे बळी गेल्याचं सागर पवार यांनी सांगितले आहे.
अचानक वाढलेल्या तापमानामुळे कोंबड्यांचा रोजच बळी जात असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
वास्तविकतः कोंबड्या या जातीप्रमाणे तसेच त्यांच्या आरोग्य प्रमाणे तापमानाचा सामना करत असतात त्या ३५ ते ४० डिग्री तापमानापर्यंत जिवंत राहू शकतात परंतू तापमान ४२ ते ४३ पर्यंत गेल्यास कोंबड्यांना ते तापमान सहन होत नाही म्हणून ते वाढत्या तापमानाचा बळी ठरतात.








