नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस थैमान घालत असल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित यांनी आपले नियोजित राजकीय दौरे थांबवून तातडीने नंदुरबार व शहादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची भेट घेतली.
आज दिनांक 18 मे 2024 रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान नाशिक मार्गे मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार येथे पोहोचले. प्रवासातच सर्वात आधी त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त रजाळे, असाणे, घोटाणे या गावात जाऊन पाहणी केली. उध्वस्तघरे उध्वस्त शेती आणि छत उडालेल्या शाळांना देखील भेटी दिल्या. त्यांच्या समवेत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पंचनामे करून शासनाच्या वतीने योग्य ती भरपाई मिळण्याबाबत ची कारवाई लवकरात लवकर करून देण्यासाठी प्रयत्न करू,
शेतकऱ्यांना वारंवार नुकसानीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सरकारी स्तरावरून योग्य त्या उपाययोजना हाती घेणे आवश्यक वाटते तथापि त्यासाठी काय करता येईल यावर आचारसंहिता संपल्यानंतर सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करूकरू; अशा शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपत्तीग्रस्तांचे सांत्वन केले.
नंदुरबार जिल्ह्यात 13 मे पासून अवकाळी पावसाचे दररोज हजेरी लागत आहे. नवापूर नंदुरबार शहादा तळोदा आणि अक्कलकुवा या तालुक्यांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला. आंबा व कैरीची मोठी नासधूस झाली. सर्व ठिकाणी झालेले नुकसान लक्षात घेता शेकडो घरे आणि विजेचे खांब कोसळणे, घरांचे व शाळांचे छत उडून जाणे, झाडे उन्मळून पडणे, याबरोबरच पिकांचे अतोनात नुकसान झाले.
नंदुरबार तालुक्यातील रनाळे, आसाणे, घोटाने परिसराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले. घरांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. शहादा तालुक्या देखील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. अद्याप पंचनामा करणे चालू असून नुकसानीचा नेमका अंदाज समोर आलेला नाही. दरम्यान, अचानक झालेल्या या पावसामुळे काढणीला आलेले बाजरी, ज्वारी तसेच अनेक शेतात काढणीस आलेली केळीची झाडेही कोसळल्याचा अंदाज आहे.
नुकत्याच लागवड झालेल्या पपई पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात उन्हापासून कोवळ्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी लावलेले महागडे क्रॉप कव्हरही खराब झाले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. नागरिक व वायरमन यांच्या मदतीने उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात येत होती. त्या नंतर रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.