नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, तोरखेडा , हिगंणी , मंदाणा परिसरात अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी हतबल झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी चार वाजता अचानक मेघगर्जनेसह सारंगखेडा व परिसरात पावसाच्या चांगल्याच जोरदार सरी कोसळल्या. जवळपास विस मिनिटे या पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बी ज्वारी काही दिवसानंतर काढण्यावर आली असताना हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा अगोदरच दिला असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे.
तसेच सारंगखेडा व परिसरात कलिंगड, खरबूज डांगर मळे अजून देखील मोठ्या प्रमाणावर उभे आहेत. त्याचबरोबर केळी बागा देखिल मोठ्या प्रमाणावर उभ्या आहेत. अवकाळी पावसात गारपिटीचा व वादळामुळे उभे पिकांचे नुकसान झाले आहेत, तर केळी पिकांचे खोड गळुन पडले आहेत, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगला धास्तावला असून शेतातील पीक हे अगदी हातात तोंडाशी आलेला घास आहे.
यातच निसर्गाचा लहरीपणा पाहिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने शुक्रवारी 20 मिनिटे पाऊस झाल्यानंतर वातावरण पूर्णतः कोरडे झाल्याने शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. तर शहादा तालुक्यातील हिगणी येथील जिल्हा परिषद शाळेचे पञे उडुन मोठे नुकसान झाले आहेत.