नंदूरबार l प्रतिनिधि
आगामी लोकसभा निवडणूक 2024 तसेच शिवजयंती (तिथीनुसार), धुलीवंदन, रमजान ईदच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी तसेच समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूका व सण उत्सव तणावमुक्त वातावरणात पार पडावेत यासाठी 15 मार्च 2024 रोजी 6 जिल्हा पोलीस दलातर्फे शहादा शहरात रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च वेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक, निलेश तांबे, एस. डी. एम. सुभाष दळवी, तहसिलदार गिरासे, अक्कलकूवा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सिमा बल (B.S.F) यांचेसह एकूण 191 पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड हजर होते.
रूट मार्च हा शहादा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (जुने पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन महात्मा गांधी पुतळा बाजार चौक जामा मस्जिद सोनार गल्ली, कुकडेल आझाद चौक, पिंगाणे पूल, अमरधाम, भवानी चौक, श्रमिक नगर, लूम गल्ली, शिवाजी नगर, सिध्दार्थ नगर, साळी गल्ली, गुजर गल्ली, क्रांती चौक, कांढार चौक बागवान गल्ली, जाणता चौक महात्मा गांधी पुतळा परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूतळा (जुने पोलीस ठाणे) असा 4 ते 5 कि.मी. मार्गक्रमण करुन समाप्त करण्यात आला.
नंदुरबार जिल्हयात आगामी निवडणूक व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावेत, तसेच निवडणूक मुक्त व न्याय्य पध्दतीने होऊन नागरिकांनी आपले मतदानाचा अधिकार मुक्तपणे बजवावा, यासाठी पोलीस विभाग कटिबध्द व सुसज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी सांगितले आहे.