नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील महिला आत्मनिर्भर बनाव्या, त्यांनी स्वतंत्र उद्योग सुरू करावे यासाठी राज्य सरकारकडे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि
केंद्र सरकारकडे आपण सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहे. त्यातूनच अनुसूचित जमातीच्या बचत गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी बचतगटांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य प्राप्त होत असून आज नवापूर तालुक्यातील 1056 बचत गटांच्या सुमारे 10 हजार महिला सदस्यांना अर्थसहाय्य निवड प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. विविध योजनांचे लाभ देण्यातील हा सुद्धा एक विक्रम आहे; असे महा संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय मार्फत अनुसूचित जमातीच्या बचत गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी बचतगटांना अर्थसहाय्य निवड पत्र वाटपाचा आज दिनांक 11 मार्च 2024 रोजी नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे बचत गटाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित बोलत होत्या. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, माजी आमदार शरद गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या वाटप प्रसंगी भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल, बकाराम गावित, नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी निर्मल माळी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात जवळपास 6 हजार महिला उपस्थित होत्या.
मी महिला खासदार असल्याने महिलांच्या समस्या सोडवण्यावर आणि त्या संबंधित योजना गावागावापर्यंत पोहोचवण्यावर आपला भर असतो. जल मिशन योजनेअंतर्गत आगामी तीस वर्षांच्या पाणी नियोजनाची सोय करून देत असून आतापर्यंत अनेक गावांना जलकुंभ उभारून हर घर नल योजनेतून पाणी पुरवण्याचे काम प्रगतीपथावर आणले आहे. बचत गटांना केंद्रीय विशेष अर्थसहाय्यातून प्रक्रिया प्रकल्प आणि छोटे उद्योग सुरू करायला मदत केली आहे. शेतीला पूरक उद्योग करता यावा म्हणून गाय बकरी वाटप सुरू आहे.
आता लवकरच केंद्राकडून शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच त्यासाठीचे साधन साहित्य पुरवले जाणार आहे; अशी ही माहिती याप्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जात असलेल्या शिक्षण कृषी तसेच महिला विषयक योजनांची माहिती दिली व महिलांनी योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनावे असे आवाहन केले. माजी आमदार शरद गावित यांनी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात झालेल्या विकासाची माहिती दिली तसेच त्यांच्या प्रयत्नामुळे लाभ देणारे योजना व विकास प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.