नंदुरबार l प्रतिनिधी
आलासे तारीका लिंगम… पाताळे हटकेश्वर… मृत्यूलोके महाकालम… सर्व लिंग नमस्तुभ्यम.. या उक्तीप्रमाणे नंदुरबार शहरातील पश्चिमेस धानोरा रस्त्यावरील रेल्वे फाटकानज़िक अष्ट सिद्धेश्वर महादेवाचे भव्य मंदिर साकारण्यात आले आहे. नवसाला पावणारे आणि जागृत असे या महादेव मंदिरात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याची फलप्राप्ती होते. अशी आख्यायिका आहे.
नंदुरबार शहराच्या पश्चिमेस धानोरा रस्त्यावर रेल्वे फाटकाजवळ अनेक वर्षांपूर्वी खोल खड्डा होता. रेल्वे गेट जवळ वळण असल्याने सन 2000 पर्यंत वर्षातून अनेक वेळा दुचाकी अपघात होत असल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली होती. या संदर्भात रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या एका भाविकाला महादेव मंदिर उभारण्याबाबत साक्षात्कार झाल्याने या ठिकाणी आज भव्य शिवलिंग मंदिर उभारण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार सर्वत्र महादेव मंदिर एकच असते. मात्र याच ठिकाणी शिवपिंडीच्या आकारातील तीन मजली महादेव मंदिर आहे. तळमजल्यावर पाताळे हटकेश्वर मध्य भागात आलाशे तारिका लिंगम आणि त्यावर मृत्यूलोके महाकालम स्वरूपातील महादेव पिंड उभारण्यात आली आहे.
सन 2001 मध्ये रेल्वे गॅंगमॅन म्हणून कार्यरत असलेले सुकलाल शेणपडू मराठे आणि काही भाविकांनी एकत्रित येऊन अष्ट सिद्धेश्वर महादेव मंदिराचे भूमिपूजन केले.
त्यानंतर आज पर्यंत या परिसरात कुठलाही अपघात झाला नसल्याचा अनुभव उपस्थित भाविकांनी कथन केला. एप्रिल महिन्यात चैत्र षष्ठीला मंदिर मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो.मंदिरात स्थापित केलेल्या महादेव पिंड ओंकारेश्वर नर्मदा येथून आणण्यात आले आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात अभिषेक व पूजेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. स्वयंभू महादेव मंदिरात पावसाळ्यात आपोआप जलाभिषेक होत असल्याची अनुभूती भाविकांनी सांगितली. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री अभिषेक आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद भंडाऱ्याचा धार्मिक उपक्रम होत असतो.
यंदाही शनिवार दिनांक अष्ट सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात आज शनिवारी भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुजारी म्हणून भरत माळी आणि बाबूलाल भोई हे सेवा बजावीत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या परिसरात सौंदर्यात भर घालणाऱ्या अष्टसिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी विविध फळ जातीची झाडे असून उन्हाळ्यात भाविकांना थंडगार शितल अनुभव येत असतो. अनेक दात्यांनी या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बाके उपलब्ध करून दिली आहेत. इतर उद्यानातील खेळण्यांप्रमाणे मंदिर परिसरात लहान मुलांच्या मनोरंजना साठी मंदिर परिसरात खेळणी देखील आहेत. अनेक कुटुंबे वनभोजनासाठी या ठिकाणी हजेरी लावतात. निसर्गरम्य व अल्हाददायक परिसर असल्याने लग्न वाढदिवस व इतर धार्मिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येतात. साधुसंतांसह अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे जागृत श्री अष्ट सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात एकदा आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन श्री अष्ट सिद्धेश्वर महादेव मंदिर धानोरा रेल्वे गेट परिसर भाविक भक्तांतर्फे करण्यात आले आहे.