शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर तिखोरा ता. शहादा येथे नुकतेच संपन्न झाले.
सरपंच सौ.कल्पनाताई सोनवणे व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. गावातील मंदिर परिसरात स्वयंसेवकांकडून स्वच्छता करण्यात आली.गावठाण परिसरात विविध वनवृक्षांचे रोपण करण्यात आले. गावाची आराध्य दैवत पद्मावती मातेच्या मंदिरात स्वच्छता करून विविध फळ, फुल व वनवृक्षांचे रोपण करण्यात आले.
शेतकऱ्यांसोबत शिवार फेरी करून विद्यार्थ्यांनी गावाच्या पीक परिसंस्थेची माहिती घेतली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील परसबाग विद्यार्थ्यांनी सुशोभित केली.सदर कार्यक्रमात विविध विषयांवर विषय तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.कार्तिक कोळी यांनी भारतीय निवडणूक प्रक्रिया व लोकशाहीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.प्रा.राकेश कापगते यांनी पशुधन विकास व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक बांधिलकी ग्रामविकास, श्रमसंस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजू करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग व गावातील नागरिक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय गवांदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील,उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्रा .मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.