नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जि.प.मधील कॉँग्रेसचे गटनेते रतन पाडवी यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
नंदुरबार येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, जि.प.सदस्य रतन पाडवी, मोहन शेवाळे, मोहन माळी, गुलाब नाईक, धुळे राष्ट्रवादीचे किरण शिंदे, ज्ञानेश्वर भामरे, सुरेश सोनवणे, नंदुरबार येथील कमलेश चौधरी, सिमा सोनगिरे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नंदुरबारात आगमन झाल्यानंतर त्यांचे पक्षाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले.
यापुढे अजित पवार म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद नवे व जुने कार्यकर्ते मिळून आणखी वाढविण्यासाठी जोमाने काम करा. लोकांची कामे व्हावीत यासाठी राजकीय भूमिका घेतली. वंचित, गरजूंना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करावयाचे आहे. आदिवासी समाजाला बजेटमध्ये मिळणारा निधी कमी असल्याने पुरवणी मागणींमध्ये अडीच ते तीन हजार कोटींचा भरघोस निधी देऊन समाजाची प्रगती साधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सरकार असतांना भरघोस निधी देऊन बॅरेज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी आता सरकारी खर्चाने सुरळीत करण्यात येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यास नुसत्याच पावसावर शेती करणे शक्य नाही. यामुळे उपसा सिंचन योजनांवर भर दिला जात आहे. नरेंद्र मोदींना थांबविण्यासाठी विरोधक एकत्र आले असले तरी आघाडीच्या फुग्यात आता पाणी भरले जात असल्याचा टोला पवार यांनी यावेळी लगावला.
राज्याचा सर्वांगिण विकास हेच राष्ट्रवादीचे ध्येय आहे. रोखठोक भूमिका असल्याने मोठ्या प्रमाणावर जनता साथ देत असल्याचे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा घेऊन राष्ट्रवादीची वाटचाल सुरु आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असून यावेळी आदिवासी, बिगर आदिवासी अशा सर्वच घटकांना न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, सुरज चव्हाण यांनी महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे असल्यास राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले. डॉ.अभिजीत मोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विकासाचा ध्यास असल्याने क्षणाचाही विचार न करता अजित पवारांसोबत जाण्याचा एकमुखी निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला. कार्यकर्त्याला जपणारे नेते अजित पवार असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत आहे. नंदुरबार जिल्हा विकासासाठी सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणीही यावेळी डॉ.मोरे यांनी केली.
नंदुरबार जि.प.मधील कॉँग्रेसचे गटनेते रतन पाडवी यांनी कॉँग्रेसला रामराम करत उपमुख्यमंत्री पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. श्री.पाडवी यांच्यासह केवजी पाडवी, मतिन खाटीक, सय्यद रियाज आदींनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच नवापूर व अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात आता ताकद वाढली असल्याने येथे विधानसभा निवडणूकीप्रसंगी राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी केली.