नंदुरबार l प्रतिनिधी
दि.२५ जानेवारी रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांविषयी चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती लवकरच समाजाचे प्रश्न मार्गी लागतील व येणार्या संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीपूर्वी म्हणजेच १५ फेब्रुवारी २०२४ पूर्वी बंजारा समाजाला निश्चितपणे गोड बातमी देणार, असे ना.महाजन यांनी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी सर्वप्रथम गोदरी महाकुंभ घडवून आपण बंजारा समाजाला फक्त देशातच नाहीतर विदेशापर्यंत लौकीक मिळवून दिले म्हणून बंजारा समाजाच्यावतीने भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडवणीस, गिरीष महाजन व रामेश्वर नाईक या सगळ्यांचे आभार मानले व यावेळी बंजारा समाजाच्या खालील प्रलंबित मागण्या ना.महाजन यांना चव्हाण यांनी विस्तृतपणे सांगितल्या.
प्रमुख मागण्यांमध्ये बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी (१५ फेब्रुवारी) शासकीय सुट्टी जाहीर करावी. राज्यातील सुमारे ५ हजार तांड्यांना सरसकट (कुठल्याही अटीविना) महसुली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायती करण्यात याव्यात. वसंतराव नाईक तांड वस्ती सुधार योजनेवर संपूर्ण महाराष्ट्रात अशासकीय सदस्य तातडीने नियुक्त करावेत. राज्यातील नगरपालिका, महानगरपालिकांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेत सुद्धा स्विकृत सदस्य घेण्यात यावेत.
जातीचे दाखले व जात पडताडणी प्रमाणपत्रावरील जाचक अटी रद्द कराव्यात. राज्याच्या धर्तीवर केंद्रीय संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधार योजना लागू करावी. उत्तर महाराष्ट्रातील बंजारा/वंजारी या शब्दांच्या अपभ्रंशामुळे जातीचा दाखला देतांना अडचणी निर्माण होतात. इ.स.चा पुरावा मागितला जातो. ते दूर करण्यासाठी खानदेशातील संपूर्ण बंजारा शेतकर्यांचा सातबारावर बंजारा असा उल्लेख करण्यात यावा.
आदी विविध मागण्या तातडीने मंजूर करुन समाजाला न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन देखील भारतीय बंजारा क्रंाती दलाच्यावतीने देण्यात आले.
यावेळी बैठकीस पोहरा देवी येथील महंत कबीरदासजी महाराज, चैतन्य परिवाराचे शाम चैतन्य महाराज, समाजाचे युवा नेते रामेश्वर नाईक, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण, राष्ट्रीय महासचिव शरद राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, आ.मंगेश चव्हाण, आ.राजेश राठोड, अरुण चव्हाण, फुलसिंग नाईक, डॉ.आकाश राठोड, कांतीलाल नाईक, ऍड.पंडित राठोड, प्रा.पी.टी.चव्हाण, अरुण चव्हाण, जितेंद्र पवार यांच्यासह विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.








