नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील भोणे फाट्याजवळ फुगे विक्रेते झोपड्याजवळ झालेल्या स्फोटात दोन बालिकांसह एक महिला असे तीन जण गंभीर भाजले आहेत.याप्रकरणी नंदूरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील भोणेफाट्याजवळ काही फुगे विक्रेते प्लास्टिकच्या झोपड्या करून राहत होते. दिनांक १७ रोजी बुधवारी रात्री अकरा वर्षाच्या सुमारास घरकुला समोरील एका मोकळ्या जागेत पुनमलाल लालसिंग भोसले रा.भिलखेडी,सराय मध्य प्रदेश याच्या झोपडी पासून सुमारे ४० ते ५० फूट अंतरावर मोठा स्फोट झाला.मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या स्फोटात अश्विनी खोडया भोसले (वय९ महिने) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच सरीणाबाई पूनमलाल भोसले व एक दहा वर्षाची मुलगी गंभीरित्या भाजली आहे.नंदुरबार येथील पोकॉ. दिलवर शामा भिल व पोना. शिवाजी वसावे पेट्रोलिंग करत असताना त्यांना सदरची बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला.यानंतर योगेश चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ,पोकॉ. भटू धनगर, पोलीस नाईक चौधरी, किरण मोरे, विशाल मराठे आदीचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी घटनास्थळी पाहणी केली असता पूनमलाल भोसले यांनी स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे ठेवलेले आढळून आले.यामुळे स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कलम 286,337,0338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत जखमींना विचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.