नंदुरबार l प्रतिनिधी
खा.डॉ. हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार-तळोदा रस्त्याचे चौपदरीकरण करण्याला मान्यता मिळाली आहे. यामुळे नंदुरबार तळोदा रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे त्रासलेल्या नागरिकांची अखेरीस सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राष्ट्रीय महामार्गांच्या विकासामध्ये गुंतले असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नंदुरबार ते तळोदा चौपदरीकरण केले जाणार आहे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाईल; अशी माहिती खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली.
या मार्गावरून प्रचंड प्रमाणात जड वाहतूक चालते. महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातून वाहणाऱ्या संपूर्ण जड वाहतुकीचा ताण नंदुरबार शहरातून तळोदा कडे जाणाऱ्या रस्त्यावर पडतो. याच वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी हातोडा पूल उभारण्यात आला. वाहतुकीचा त्या काळात सर्वे करण्यात आला होता. त्याकाळी आजच्यापेक्षा कमी वाहतूक असल्यामुळे नंदुरबार तळोदा रस्त्याचे दुपदरीकरण अथवा चौपदरीकरण करण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता.
तथापि मागील पाच वर्षात नंदुरबार तळोदा रस्त्यावर आंतरराज्य वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले. वाळू डंपर आणि तत्सम जड वाहनांमुळे या मार्गाची प्रचंड दुर्दशा झाली. वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यात्यामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी महासंसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तसेच पत्र देऊन वारंवार या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाला आणि अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाच्या चौपदरीकरणाला नुकतीच मंजुरी दिली.
महाराष्ट्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या कामाची निविदा काढण्यात आली. तळोदा ते नंदुरबार रस्त्याचे चौपदरीकरण आणि चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनी संदर्भाने पुनर्वसन करण्याच्या कामाचा त्यात उल्लेख आहे.
शेवाळी-नेत्रंग महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अर्थात शेवाळी ते नंदुरबारपर्यंतचे काम सुरू असून बऱ्याच अंशी प्रगतीपथावर आले आहे. दुसरा टप्पा हा नंदुरबार ते तळोदा व पुढे गजरात असा राहील. चौपदरीकरणाच्या आणि पुनर्वसनाच्या संदर्भात काढण्यात आलेली निविदा याच कामाशी संबंधित आहे. 29 किलोमीटर लांबीच्या या चौपदरीकरण आणि पुनर्वसनासाठी 608.47 कोटी रुपये एवढ्या खर्चाची तरतूद करण्यात आली असून संबंधित ठेकेदाराला 30 महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करावे लागणार आहे. पुढील दहा वर्षे त्याने या रस्त्याची देखभाल करावयाची आहे.








