नंदुरबार l प्रतिनिधी
व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हातर्फे आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व दर्पण दिनानिमित्त नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात 200 हुन अधिक पत्रकारांचा सन्मान करून आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित म्हणालेत की, पत्रकारांनी समाजातील वास्तव बाहेर आणावे गोरगरीब, दलित, पीडीत व शोषीतांना कोणताही त्रास होता कामा नये, तसेच विचारांना दिशा देणारी पत्रकारिता हवी, असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी ना.डॉ.गावित पुढे म्हणाले की, विचारांची दिशा देणारी पत्रकरीता आज लोप पावत चालली आहे. पूर्वीच्या काळात समाजात जागृती करणारी पत्रकारिता होती. विकास कामांसाठी पत्रकारिता सजग राहिली पाहिजे, पत्रकारांच्या लेखणीतून समाज परिवर्तन करण्याची ताकद असावी, आद्य पत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले पाक्षिक काढून समाजातील वाईट रूढी परंपरा काढून टाकण्याचा प्रयत्न केला. दर्पण मधूनच समाजसुधारणा व स्वदेशाभिमान लोकांमध्ये रूजवला म्हणूनच त्यांचा जन्म दिवस 6 जानेवारी हा पत्रकार दिन दर्पण दिन म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील पत्रकारांनी मला राजकीय जीवनात सहकार्य केले आहे, असे सांगितले.
यावेळी खा.डॉ.हिना गावित यांनी आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून जिल्ह्यातील पत्रकारांना शुभेच्छा दिल्यात. त्यापुढे म्हणाल्यात की, पत्रकारांनी सर्व समावेशक घटकांना न्याय देवून सकारात्मक पत्रकारिता करावी आणि ज्वलंत विषयांवर लिखाण करावे व जिल्ह्यातील विकास कामांना देखील मदत व्हावी अशी पत्रकारिता व्हावी, असे त्यांनी सांगितले. दरम्यान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही पत्रकारांना शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आदर्श पत्रकारिता करून गोर-गरीबांच्या समस्या लेखणीतून मांडून सर्व स्तरातरील व्यक्तींना न्याय द्यावा, पत्रकारिता करीत असतांना सर्व बाजू एकत्रित करून लिखाण करावे, असे त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.पितांबर सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणालेत की, व्हॉईस ऑफ मिडीया ही देशातील सर्वाधिक सदस्य असलेली संघटना असून जिल्हा शाखेच्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला असून येणार्या काळातही पत्रकारांसाठी विविध योजना व सर्वाच्या हितासाठी लढणारी संघटना आहे. असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक हाईस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी मानले. स्मित हॉस्पिटलचे डॉ.विशाल चौधरी, निखील तुरखिया, साप्ताहिक विंगचे राज्य कार्याध्यक्ष राजू पाटील, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुंभार, कार्याध्यक्ष धनराज माळी, सरचिटणीस राकेश कलाल, उपाध्यक्ष योगेंद्र जोशी, उपाध्यक्ष बाबासाहेब राजपूत, नंदुरबार तालुकाध्यक्ष वैभव करवंदकर, शहादा तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, नवापूर तालुकाध्यक्ष नीलमकुमार पाठक, तळोदा तालुकाध्यक्ष राजेश माळी, धडगाव तालुकाध्यक्ष राजु पावरा व जिल्ह्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विष्णु जोंधळे यांनी तर आभार राजेश कलाल यांनी मानले. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मिडीयाच्या सर्व तालुकाध्यक्षांनी व विविध पत्रकरांनी मनोगत व्यक्त केले.








