नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या उमेदवार डॉ.हीना गावितच राहणार असून त्या पुन्हा एकदा विजयी होणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासरथ रोखण्यासाठी इंडीया विकास आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे.असे असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत ४०० हून अधिक जागांवर भाजपा विजयी होणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. नंदुरबार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त ते नंदुरबार दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यापुढे मंत्री आठवले म्हणाले की, देशाच्या इतिहासात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्याने आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशाला विकासाच्या दिशेने घेवून जाण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून करण्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधकांनी मोट बांधली असली तरी भाजपा ४०० हून अधिक जागांवर विजयी होणार आहे. आंबेडकरी जनतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आपण शिर्डी येथून तर आणखी एक उमेदवार विदर्भातून आंबेडकरी जनतेच्या मागणीनुसार भाजपाने दिला पाहिजे, असे सांगितले. मराठा आरक्षणाबाबत केंद्रीय मंत्री आठवले यांनी मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देता येऊ शकते.

मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. यातून ते मार्ग काढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्री आठवले यांनी राम मंदिर हे संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान असून मंदिराचे लोकार्पण हे भाजपाच्या प्रचारासाठी नव्हे तर देशातील लोकांच्या श्रद्धेतून होणार असल्याचे सांगत राज्यातून सुमारे ३५० हून अधिक जणांना निमंत्रित करण्यात आल्याचेही ते म्हणाले. राज्यात विधानसभा निवडणुका लागू झाल्यास ८ ते १० जागा या भाजपाकडून मिळवून घेणार आहोत. त्यासाठी चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले.
नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या उमेदवार डॉ.हीना गावितच राहणार असून त्या पुन्हा एकदा विजयी होणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. याप्रसंगी खासदार डॉ. हीना गावित, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जि.प.सदस्य भरत गावित, अरविंद कुवर, सुभाष पानपाटील, राम साळुंके, अशोक शिरसाठ, अनिल कुवर आदी उपस्थित होते.








