तळोदा l प्रतिनिधी
अयोध्या येथे अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाची तळोदा शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने दि.2 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
तळोदा शहरातील मुख्य रस्त्यावरील दत्त महाराज मंदिर ते मराठा चौक, ठाणेदार गल्ली, माळीवाडा, भोई गल्ली, स्मारक चौक मार्गे शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत, डोक्यावर कलश घेत ‘जय श्री राम नामाचा जय जय कार’ केला. ठीक ठीकणी रस्ते रांगोळी ने सजले होते.
शोभा यात्रेतील राम, लक्ष्मण, सीता तसेच हनुमान यांच्या सजीव देखाव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. प्रामुख्याने दत्त भजनी मंडळ, चीनोदा येथील भजनी मंडळ यांनी सहभाग घेत राम धून भजन सादर केले. अवघे शहर ‘जय श्री राम’ नामाने दुमदुमले होते.
तसेच संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या कलश शोभायात्रेची सांगता मेन रोड वरील श्री राम मंदिर येथे आरती करून करण्यात आली. 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान जिल्हाभरात या अक्षदांचे घरोघरी वाटप होणार आहे. येत्या 17 जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार असून 22 जानेवारीला या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने कलश यात्रेचे आयोजन राज्यभरात करण्यात येत आहे.
या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, योगेश चौधरी, कैलास चौधरी, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, जालंधर भोई, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, डॉ शशिकांत वाणी, गौरव वाणी, विश्व हिंदू परिषदेचे धनंजय बारगळ, जिल्हा मंत्री विजय सोनवणे, राणे सर, मुकेश जैन, कुवर सर, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रे दरम्यान पोलीस निरिक्षक राहुल पवार याच्या मार्गदर्शनखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.








