नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लेंकेटचे वाटप करुन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
31 डिसेंबर 2023 रोजी अवघे जग सरत्या वर्षाला निरोप देवून नववर्षाचे स्वागत करीत असतांना पोट भरण्यासाठी स्थलांतर करुन उघड्यावर आयुष्य जगणाऱ्यांना राहण्यासाठी घर नसल्यामुळे रात्रीच्यावेळी रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा रस्त्याच्या कडेलाच राहावे लागते.
रक्त गोठवणाऱ्या थंडीत उघड्यावर झोपलेली कोवळी मुले मात्र पाय पोटात घेऊन कुडकुडत झोपलेली असतात. सध्या कडाक्याची थंडी सुरु असून नंदुरबार जिल्ह्याचा पारा देखील खाली घसरला आहे. अशा थंडीत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीत कुडकुडत फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लँकेट व चादरचे वाटप केले.
ज्या नागरिकांना घरे आहेत थंडीत गरम कपडे घेवून स्वतःचे व परिवाराचे संरक्षण करु शकतात इतके आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, मात्र ज्यांच्याकडे घर नाही, अंगावर थंडीचे कपडे नाहीत असे फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या निराधारांचे काय ? याचा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील सहानुभूतीपूर्वक व माणुसकीच्या नात्याने विचार करीत फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लॅकेट व चादरचे वाटप करुन जिल्हा पोलीस दलाची मायेची ऊब मिळावी अशी संकल्पना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे समोर मांडली.

त्यांच्या या संकल्पनेला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आप- आपल्या पोलीस ठाणे हद्दीत तसेच पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानकव इतर ठिकाणी थंडीत कुडकुडत फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लॅकेट व चादरचे वाटप केले.
रात्री नववर्षाचे स्वागत होत असतांना थंडीत कुडकुडत फुटपाथवर उघड्यावर राहणाऱ्या सुमारे 1500 निराधारांना ब्लॅकेट व चादर वाटप केले होते.
यावर्षी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने नंदुरबार शहर पोलीस ठाणे-90, उपनगर पोलीस ठाणे-85, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-60, नवापूर पोलीस ठाणे-90, विसरवाडी पोलीस ठाणे-70, शहादा पोलीस ठाणे- 90, सारंगखेडा पोलीस ठाणे-60, धडगांव पोलीस ठाणे-80, म्हसावद पोलीस ठाणे-90, अक्कलकुवा पोलीस ठाणे-70, तळोदा पोलीस ठाणे-70, मोलगी पोलीस ठाणे-50 आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 110 असे एकूण 1015 निराधारांना ब्लॅकेट व चादर वाटप करण्यात आले आहे.
सदर वेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचेसह नंदुरबार शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.








