शहादा l प्रतिनिधी
गटशेती चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन राज्यात पानी फाऊंडेशन सोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयात आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.पाणी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी निवड केलेले 34 विद्यार्थी राज्यातील 46 तालुक्यात पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील.
याबाबत पानी फाउंडेशनच्या वतीने महाविद्यालयास पत्र सादर करण्यात आले आहे.त्यात म्हटले आहे की,पानी फाऊंडेशनची स्थापना सन 2016 साली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या हेतूने करण्यात आली. पुढच्या चार वर्षांत मृदा आणि जलसंधारणाचे उत्कृष्ट काम करण्याच्या उद्देशाने 76 तालुक्यांतील गावागावांमध्ये ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धा आयोजित केली होती. गावकऱ्यांच्या मेहनतीने ज्या गावांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध झाले, त्या गावांमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी 2019-21 या काळात ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचे आयोजन केले. ‘जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा कोणतीही समस्या सोडवता येऊ शकते’, असे मार्गदर्शक तत्त्व राहिले आहे.
याच विश्वासाने 2022 पासून गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उपजीविका वाढविण्याच्या उद्देशाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा आयोजित करत आहोत. त्याअंतर्गत शेतीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या महाराष्ट्रातील आघाडीच्या कृषी विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. त्यानुसार या विद्यापीठांमधील आघाडीचे शास्त्रज्ञ 25 हून अधिक पिकांसाठी डिजिटल शेतीशाळा आयोजित करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देत आहेत.
महाराष्ट्रातील गटशेती चळवळीला बळकटी देण्यासाठी आम्हाला आमच्या टीममध्ये प्रशिक्षक म्हणून शेतीची पार्श्वभूमी असलेल्या तरूण व उत्साही लोकांची गरज आहे. प्रतिष्ठित महाविद्यालयातून गेल्या 3 वर्षात पदवी घेतलेल्या तरुण-तरुणींपैकी कोणाला या चळवळीत सामील व्हायला आवडेल का हे पाहण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संवाद साधू इच्छितो.निवड झालेल्या प्रशिक्षकांची आम्ही काम करत असलेल्या 46 तालुक्यांपैकी एका तालुक्यात नियुक्ती होईल. तिथे ते अत्यंत प्रेरित टीमसोबत काम करतील.
त्यांना महाविद्यालयात मिळालेले ज्ञान कृतिशील व अर्थपूर्ण पद्धतीने वापरण्याची संधी मिळेल. शिवाय त्यांना आपल्या भविष्यासाठी अतिशय मौल्यवान शिक्षण देणारा हा अनुभव असेल असे आम्हाला वाटते. हे काम पूर्णवेळ असेल (फेब्रुवारी 2024 ते जानेवारी 2025) व त्यांना योग्य मानधन तसेच निवास,भोजन, प्रवास खर्च दिला जाणार आहे.
दरम्यान,पानी फाउंडेशनच्या वतीने येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात शुक्रवारी कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला.यावेळी पानी फाऊंडेशनचे मास्टर तांत्रिक प्रशिक्षक रवींद्र पोमने, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र समन्वयक सुखदेव भोसले, शहादा तालुका समन्वयक गुणवंत पाटील, तांत्रिक प्रशिक्षक भारती शिंदे, नंदुरबार तालुका समन्वयक भूषण ठाकरे, तांत्रिक प्रशिक्षक प्रणय गोरीवले.
प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी स्वागत केले.महाविद्यालय परिसराची तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यांवेळी 95 माजी विद्यार्थी मुलाखतीस हजर होते.त्यांतील 34 जणांची निवड करण्यात आली असून त्यांना पानी फाउंडेशनच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत.कृषि महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.








