नंदुरबार l प्रतिनिधी
येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आव्हान 2023 सराव शिबिराचे व रासेयो एककाचे उद्घाटन विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम जे रघुवंशी होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एन. मोरे व जिल्ह्याचे पोलीस उपअधिक्षक संजय महाजन लाभलेत.
श्री.मोरे यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे सांगितले तसेच विद्यार्थिनींचा उच्चशिक्षणातील सहभाग व सक्रियता याबद्दल समाधान व्यक्त केले. संजय महाजन यांनीही आपल्या विद्यार्थी दशेतील राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध अनुभव स्वयंसेवकांसमोर कथन केलेत. डॉ. सचिन नांद्रे यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेत नेहमीच सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना व नेतृत्वगुणांना विविध शिबिरांमधून कसा वाव मिळेल या संदर्भातही मार्गदर्शन केले. आव्हान शिबिराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जीवन जगत असताना मानवनिर्मित व निसर्गनिर्मित विविध आपत्तींना धिरोदत्तपणे कसे सामोरे जायचे यासंदर्भातही मार्गदर्शन केले व स्वयंसेवकांना राज्यस्तरीय आव्हान 2023 मध्ये सहभागी होण्याचे सुचित केले. डॉ. एम.जे.रघुवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात राष्ट्रीय सेवा योजना नेहमीच उपक्रमशील विभाग असून यातील स्वयंसेवकांमुळे महाविद्यालयाला नावलौकिक प्राप्त झाले असे सांगितले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा वैभवशाली इतिहास त्यांनी उपस्थितांच्या समोर नमूद केला. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे समन्वयक प्रा डॉ.एम. एस. रघुवंशी,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. जे.सोमाणी, नंदुरबार जिल्ह्याचे रासेयो समन्वयक प्रा डॉ.विजय पाटील विभागीय समन्वयक प्रा. डॉ. अमोल भुयार व प्रा डॉ. मनोहर पाटील उपस्थित होते.
या शिबिराकरिता नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातून स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वयंसेवकांच्या निवडीकरिता तज्ञ म्हणून प्रा. डॉ. एस यु अहिरे, प्रा. टी. एल. दास व डॉ. व्ही. ए. पाटील लाभलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनेश देवरे यांनी तर सूत्रसंचालन जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. उपेंद्र धगधगे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. माधव कदम, राष्ट्रीय छात्र सेनेचेअधिकारी प्रा. डॉ. विजय चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मनोज शेवाळे व वरिष्ठ स्वयंसेवकांनी परिश्रम घेतलेत