नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा जवळ असलेल्या ढाब्यावर थांबलेल्या बिल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या ट्रकमध्ये ३३ लाख ६७ हजार रुपयांची अवैध दारू पोलिसांनी जप्त केली. वाहनासह एकूण ४३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदूरबार जिल्ह्याच्या हद्दीतून गुजरातकडे अवैध दारू नेणारा मालट्रक जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शहादा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहादा पोलिसांनी शहादा- दोंडाईचा रस्त्यावर पाळत ठेवली. शहादानजीक असलेल्या एका ढाब्यात संशयित मालट्रक (क्रमांक यूपी -५७ एटी -९६७९) उभा असल्याचे दिसून आला. पथकाने त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली केबिनमध्ये झोपलेल्या शरनकुमार भिराराम गोधारा (२३) रा. डडूसन, जि. जालोर या चालकाने मालट्रकमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे सांगून तसे ई वे बिल दाखविले. माल हुबळी (कर्नाटक) येथून भरून तो उदयपूर राजस्थान येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.
परंतु मिळालेली बातमी खात्रीशीर असल्याने पथकाने मालट्रक शहादा पोलिस ठाणे येथे आणून वाहनाची तपासणी केली असता त्यात असलेला माल सिलबंद दिसून आला. वाहनाचे सिल उघडून खात्री केली असता त्यात खाकी रंगाचे बॉक्स व त्यामध्ये विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. त्यात १४ लाख ४० हजार रुपये किमतीची इम्पेरियल ब्ल्यू ग्रीन व्हीस्की, १४ लाख ४० हजार रुपये किमतीचे रॉयल ब्ल्यू माल व्हिस्की, ३ लाख ८८ हजार ८० रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज फिनेस्ट प्रीमियम व्हिस्की. ९९ हजार ३६० रुपये किमतीची एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की व १० लाख रुपये किमतीचा मालट्रक असा एकूण ४३ लाख ६७ हजार ४४० रुपये किमतीचा माल आढळून आला.
याबाबत शरनकुमार भिराराम गोधारा यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कालुभाई ऊर्फ सरफराज अहेमद रियासल अली रा. पैयकवली लालासुकरावली कृषी नगर, उत्तर प्रदेश, सत्तार ठाकरे, विजय ठाकरे दोन्ही रा. शहादा यांची नावे सांगितल्याने शरनकुमार सह त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उप निरीक्षक प्रिया वसावे, जमादार रतन पावरा, हवालदार नितीन भालेराव, किरण पावरा, संदीप लांडगे, दिनकर चव्हाण व भरत उगले यांच्या पथकाने केली.








