नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात २७ ऑक्टोबर २०२३ पासून नागरिकांकडून दावे, हरकती म्हणजेच मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदणीची दुरुस्ती व नावे वगळण्यासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच त्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने विशेष शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील नागरिक महिला, दिव्यांग, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसह दावे व हरकतींसाठी ९ डिसेंबर २०२३ ही अंतीम मुदत असून, या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी नवयुवकांची भूमिका महत्वाची असून, मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिला, दिव्यांग व विद्यार्थी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात देखील करण्यात आले असून, महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थिनी यांच्यासह समाजातील दिव्यांग, तृतीयपंथी, वंचित घटक यांचा मतदार प्रक्रियेत सहभाग वाढवा यासाठीही प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येत आहे.
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ साठी ९ डिसेंबर, २०२३ हा दिवस दावे, हरकती व मतदार नोंदणीचा अर्ज स्विकारण्याचा अंतीम दिवस असून जिल्ह्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनीधी यांनी नागरीकांमध्ये अधिकाधिक मतदान नोंदणी होईल या बाबत आवाहन करून जनजागृती करण्याबाबत व या कार्यक्रमात सहभाग घेऊन १८-१९ वर्षे वरील सर्व युवक – युवती यांची मतदार नोंदणी करून घ्यावी,असेही आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.