नंदुरबार l प्रतिनिधी
अंमली पदार्थ मुक्त जिल्हा मोहिमेंतर्गत शहादा तालुक्यातील नवानगर शिवारातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या केळीच्या शेतातून 17 लाख 74 हजार रुपये किमंतीचा तब्बल 2 क्विंटल 53 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला.
अधिक माहिती अशी की, 2 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील नवानगर गावातील एका इसमाने त्याचे केळी पिकाचे शेतात स्वतः च्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांचे एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांचे पथक हे मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे शहादा पोलीस ठाणे हद्दीतील नवानगर शिवारातील वडगांव ते नवानगर रस्त्यावर एका केळीच्या शेताजवळ आले. त्याठिकाणी केळीचे पीक असलेल्या शेताच्या बांधावर एक इसम हालचाली करत असल्याचे दिसुन आले. पोलीस त्याच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या इसमाने तेथून पळ काढला, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळून जाणाऱ्या इसमाचा पाठलाग सुनिल मेरसिंग चव्हाण रा. नवानगर, ता. शहादा यास अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केळीच्या पीक असलेल्या शेताची पाहणी केली असता आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केलेली व ठिकठिकाणी काही झाडे खोडापासून कापलेले एका ठिकाणी जमा करुन ठेवल्याचे दिसुन आले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपुर्ण केळीचे शेत पिंजुन काढले असता तेथे संपूर्ण शेतातून 2 क्विंटल 53 किलो 584 ग्रॅम वजनाचे 17 लाख 74 हजार 626 रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आले. गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली. तसेच संशयित आरोपी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल मेरसिंग चव्हाण रा. नवानगर, ता. शहादा याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 650/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 8 (क), 20 (ब), ii(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस हवालदार संदीप गोसावी, पोलीस नाईक सुनिल पाडवी, मोहन ढमढेरे, विशाल नागरे, बापू बागूल, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, शोएब शेख, दिपक न्हावी, यशोदिप ओगले, हेमंत बारी, हेमंत सैंदाणे, उदेसिंग तडवी यांचे पथकाने केली. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.








