नंदुरबार l प्रतिनिधी
येथे आयोजित मोफत हृदयरोग निदान शिबीराला रूग्णांचा चांगला प्रतिसाद लाभला असून यात 150 हून अधिक रूग्णांवर उपचार करण्यात आले.
नाशिक येथील नामांकित साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँण्ड रिसर्च सेंटर व साक्षी मेमोरियल फाऊंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत शिबीराचे आयोजन द्वारकाधीश मंदिरातील संत हॉलमध्ये करण्यात आले होते. यात 150 हून अधिक गरजू रुग्णांनी याचा लाभ घेतला. शिबीराचे उद्घाटन डॉ.निलेश तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी खजिनदार विनय श्रॉफ व द्वारकाधीश ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल शर्मा उपस्थित होते.अध्यक्षस्थानी साक्षी मेमोरियल फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगिता दिलीप साळुंके होत्या.
या शिबीरात रक्तातील साखर, मधुमेह असलेल्या रुग्णांची मागील तीन महिन्यातील साखर, बीपी तसेच ईसीजी या तपासण्या मोफत करण्यात आल्या. डॉ.निलेश तावडे यांनी उपस्थितांची तपासणी करून ह्रदयरोगासंबंधी माहिती देऊन हृदयाचे कार्य चांगले चालावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी लहान मुलांच्या ह्रदयाच्या आजाराविषयी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. डॉ.शैलेश बडवर यांनी मधुमेह आजाराविषयी रुग्णांना उपचार व आहार-विहारा विषयी माहिती देऊन उत्तम आरोग्य कसे ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
श्री. साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँण्ड रिसर्च सेंटर यांचेकडे उपलब्ध असलेल्या शासकीय व अन्य उपलब्ध योजनांविषयी माहिती यावेळी देण्यात आली. शिबीराची सांगता वृक्षारोपणाने करण्यात आली. यशस्वीतेसाठी संतोष आहेर, विनोद भदाणे, राजेंद्र शिंदे, कल्पेश वाळके, सचिन चव्हाण, रुचिता तांबोळी, दिनेश चौधरी, उमर्देचे ग्रा.पं.सदस्य पंकज मराठे, प्रकाश बेंद्रे, जय शिंदे व मराठा समाज परिवर्तन चळवळीचे अध्यक्ष चंद्रकांत जगदाळे यांनी परिश्रम घेतले.








