नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी काळात मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. चार राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचा गुन्हे आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे नंदुरबार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

निवडणुकीचा आढावा झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मागील काही दिवसात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व देवून सत्कार करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा गुन्हे अभिलेखावरील ना उघड 5 जबरी चोरी व 2 पोलीस असल्याची बजावणी करुन फसवणूकीचे गुन्ह्यातील ईराणी टोळीकडून सुमारे 8 लाख 73 रुपये किमतीचे 23 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करुन तसेच इतर राज्य व जिल्ह्यातील एकूण 20 गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांचे पथकाचा तसेच 19 मार्च 2022 रोजी मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील हुनाखांबचा चेनवाईपाडा येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन जिवे ठार मारणाऱ्या दोन अज्ञात आरोपीतांना बेड्या ठोकून
अतिशय क्लिष्ट व संवेदनशील असा उघडकीस आणल्याबद्दल या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्य पोलीस दलात जुलै-2022 महिन्यासाठीच्या गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न या पुरस्काराकरिता निवड झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सदर गुन्ह्यात मोलाची भूमीका बजावणारा एंजल या श्वानाचा देखील पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
गुन्हे आढावा बैठकी दरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आगामी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतूक, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये गुन्हा करुन नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्य करीत असलेले फरार / पाहिजे, स्टँडींग वॉरंटमधील आरोपी, अवैध अग्निशस्त्र व NDPS बाबत जास्तीत जास्त कारवाईबाबत व सराईत गुन्हेगारांविरुध्द् कठोर कारवाई करण्याबरोबरच सामान्य जनतेशी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सौजन्य राखावे असे ही त्यांनी सांगितले. तसेच टोळ्यांमध्ये काम करणाऱ्या गुन्हेगारांचे गँग हिस्ट्रीशिट उघडून गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील कार्यालय अधीक्षक संजय ओगले, श्रेणी पोलीस उप निरीक्षक युवराज वाणी नेमणूक शहर वाहतूक शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार किशोर पाटील त्यांच्या वयाची 58 वर्षे झाल्यामुळे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. कार्यालय अधीक्षक संजय ओगले यांनी 38 वर्षे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक युवराज वाणी यांनी पोलीस दलात एकूण 39 वर्षे तर पोलीस हवालदार किशोर पाटील यांनी भारतीय सैन्य दलात 20 वर्षे व पोलीस दलात 17 वर्षे 10 अशी एकूण 37 वर्षे 10 महिने सेवा बजावली आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना सेवानिवृत्ती नंतर ज्या काही अडीअडचणी असतील त्या समक्ष भेटून मांडाव्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अमलदारांच्या अडचणी निश्चीतच सोडविल्या जातील. तसेच सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे सर्व प्रकारचे लाभ लवकरात लवकर त्यांना देण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदर बैठकीच्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक विश्वास वळवी, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहादा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या सर्व शाखा प्रभारी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.








