नंदुरबार l प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार राज्यात 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यातील 18 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्ह्यात 18 ते 19 वर्ष वयोगटातील नवमतदारांची नोंदणी अत्यल्प असून एकूण युवक-युवती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वयोगटातील मतदार नोंदणी कमी आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 27 ऑक्टोंबर ते 9 डिसेंबर 2023 या काळातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. या काळात जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी दिवाळी सुट्टी व परीक्षांच्या वेळापत्रकांचा अंदाज घेऊन प्रत्येक महाविद्यालयात मतदान नोंदणीच्या शिबिराचे नियोजन करावे. महाविद्यालयांमध्ये नोंदणी शिबिरांचे आयोजन करतांना तेथील ऑनलाईन, ऑफलाईन मतदार नोंदणीच्या सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य अभिप्रेत असून निवडणूक साक्षरता मंडळाच्या कॅम्पस अॅम्बेसेडर व संस्था यांचे सहकार्य घेऊन जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 100 टक्के मतदार नोंदणी करण्यावर भर द्यावा.
जे महाविद्यालय 100 टक्के नवमतदारांची नोंदणी करतील, अशा महाविद्यालयांना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयामार्फत उत्कृष्ठ मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कार देण्यात येणार आहे.
मतदार नोंदणी शिबिर घेणे तसेच ऑनलाईन प्रशिक्षणाबाबत अक्कलकुवा, अक्राणी, शहादा, तळोदा, नंदुरबार व नवापूर येथील तहसिल कार्यालय हे मदतीसाठी उपलब्ध असतील. तरी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.








