नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी काळामध्ये कॉँग्रेस पुन्हा एकदा भरारी घेणार असून लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचा उमेदवार विजयी होणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित कॉँग्रेस कार्यकर्ता मेळावा व आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रवक्ते मदन जाधव, नंदुरबार जिल्हा निरीक्षक रणजितसिंग पावरा, जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे, आ.शिरीष नाईक, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी खा.बापू चौरे,
जि.प.सदस्य रतन पाडवी, सी.के.पाडवी, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सुरेश इंद्रजित, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. यापुढे नाना पटोले म्हणाले की, नंदुरबार जिल्हा नेहमीच कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. कॉँग्रेस सरकारच्या कार्यकाळात जनहिताच्या योजनांची सुरुवात नंदुरबारमधून झाली आहे. आधारकार्ड देखील शहादा तालुक्यातील टेंभली येथील महिलेला देऊन या योजनेचा देशभर शुभारंभ कॉँग्रेस सरकारने केला होता. मात्र गेल्या काही वर्षात कॉँग्रेसची जिल्ह्यात पिछेहाट झाली आहे. आगामी काळामध्ये कॉँग्रेस पुन्हा एकदा भरारी घेणार असून लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचा उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
यापुढे ते म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकरांच्या वचारांच्या महाराष्ट्रात भाजपा सरकारने गेल्या १० वर्षात आरक्षणाच्या नावाखाली जातीजातीत संघर्ष निर्माण केल्याचे काम आहे. प्रत्यक्षात मात्र आरक्षण कोणालाही दिलेले नाही. महिलांना ५० टक्के आरक्षणाचा कायदा कॉंग्रेस सरकारच्या काळात होत असतांना कॉँग्रेसने विरोध दर्शविला. मात्र आता श्रेय घेण्यासाठी महिला आरक्षण दिले असून यास कॉंग्रेसने पाठींबा दशॅविला आहे. देशात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असतांना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट भाजपा सरकारने रचला आहे. यामुळे भाजपा सरकार जनसामान्यांच्या विरोधातील सरकार असल्याने आगामी निवडणूकांमध्ये जागा दाखवा, असे आवाहन केले. सन २०२१ मध्ये जातीनिहाय जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र आता २०२३ अखेर आला असतांनाही जातीनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. यामुळे जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत आरक्षण देता येणार नाही.
कॉंग्रेसने जनगणना केल्याची सातत्याने मागणी केली असतांनाही भाजपा सरकार हुकूमशाही पद्धतीन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. यादरम्यान, आ.शिरीष नाईक यांनी नंदुरबार जिल्हा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातडी सातत्याने कॉँग्रेसच्या पाठीशी राहिले असल्याचे सांगितलेे. माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी भाजपाचा देशाला संपविण्याचा डाव असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले. प्रतिश शिंदे यांनी भाजपाने सर्वसामान्यांचे शोषण केले असून संविधानाप्रमाणे कारभार चालत नसल्याचा आरोप केला. यावेळी राजाराम पानगव्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. दिलीप नाईक यांनी प्रास्ताविक केले.








