नंदुरबार l प्रतिनिधी
एका शिक्षिकेच्या मुलाचे अपहरण करुन तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपींना शहादा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील प्राथमिक शिक्षिका कमलाबाई नामदेव चव्हाण यांचा मुलगा रुपेश नामदेव चव्हाण (वय २२) हा शहाा तालुक्यातील लोणखेडा येथे असलेल्या इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये इंजीनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. दि.३१ ऑगस्ट २०१५ रोजी कमलाबाई चव्हाण यांना त्यांच्या मुलाच्या फोनवरून एका अज्ञात इसमाने फोन करुन त्यांचा मुलगा रुपेश चव्हाण याचे अपहरण केले असून त्यास सोडविण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागितली.
याबाबत कमलाबाई चव्हाण यांचे फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३६४(अ), ३८५, ३२३, १२०(ब), ५०७, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी याप्रकरणी संशयित अभिलाश शंकर पटेल (वय २२, रा.कर्जोत, ता.शहादा) व दिपक विजय बागले (वय २३, रा. समतानगर, मलोणी ता.शहादा) या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली होती.
शहादा पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत महत्वाचे पुरावे जमा करत दोषारोपपत्र अति. सत्र न्यायाधीश, शहादा यांचे न्यायालयात सादर केले होते. अति. सत्र न्यायाधीश सी.एस.दातीर यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच, आणि परिस्थितीजन्य पूरावे तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तीवाद या सर्व बाबींचा विचार करुन अभिलाश पटेल व दिपक बागले या दोघा आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३६४(अ) मध्ये जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, भारतीय दंड
संहितेच्या कलम ३०७ मध्ये १० वर्षे कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ मध्ये २ वर्षे कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, भारतीय दंड संहितेच्या कलम ५०७ मध्ये २ वर्षे कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड व भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ मध्ये ५ वर्षे कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.सदर खटल्याचे कामकाज पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी केले असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड.एस.ए.गिरासे यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस उप निरीक्षक राहुल भदाणे, पोलीस हवालदार परशुराम कोकणी, देविदास सुर्यवंशी यांनी कामकाज केले आहे.








