नंदुरबार l प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे लोन महाराष्ट्रात पसरले असून विविध ठिकाणी उपोषण व आंदोलने केली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खूर्दे येथील गुलाब महारु मराठे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण सुरुच राहिल असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला एक महिन्याचा अल्टीमेटम दिला होता.अद्याप राज्य शासनाने ठोस पावले उचलली नसल्याने नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथे शिवभक्त गुलाब महारु मराठे यांनी देखील 25 ऑक्टोंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा घेतला आहे. उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी मराठा समाजातील अनेक जणांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी मराठा समाजाचे नितीन जगताप, भटू बोराणे, जितेंद्र खांडवे, हरिष हराळ, नवनित शिंदे, उपसरपंच सागर मराठे,रमेश कुटे, रामभाऊ बेंद्रे व उमर्दे येथील मराठा समाज बांधव उपस्थित होते.
गुलाब मराठे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज भारतास स्वातंत्र्य मिळाले त्या दिवसांपासून शैक्षणिक, आर्थिक व समाजिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत मागास राहिलेला आहे. घटनेने, संविधानाने सर्व भारतीय नागरीकांना समान अधिकार दिलेले असून महाराष्ट्र राज्यातील ७८ टक्के मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेला आहे.
राज्यातील सर्वात मोठा, बहुसंख्य समाज असून सुद्धा या समाजातील असंख्य युवक रोजगारापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या खुपच मागास राहिलेला आहे. राजकीय पक्ष निवडणुकीपुरते खोटे आश्वासने देवून गोरगरीब मराठा समाजाची वेश करतात. असंख्य मराठा युवक गरीबी व बेरोजगारीमुळे आत्महत्या करीत आहेत. मराठा समाजाला न्याय मिळावा. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल मंदिर चौक, उमर्दे खुर्दे, ता.जि.नंदुरबार येथे अन्नत्याग उपोषण सुरुच राहिल असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.








