नंदूरबार l प्रतिनिधी
मोटार सायकल चोरट्यांच्या टोळीला शहादा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून 6 लाख 90 हजार रुपये किमंतीच्या 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून 10 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.
गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्या बाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
19 ऑक्टोंबर रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील सातपिप्री गावातील दशरथ खड़े व त्याच्या साथीदारांनी मिळून नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच मोटार सायकल चोरी केलेल्या असून दशरथ खर्डे व त्याचा साथीदार चोरीची युनिकॉर्न मोटार सायकलने प्रकाशा मार्गे सातपिप्री येथे त्याच्या घरी जात असल्याबाबत बातमी मिळाली. सदरची माहिती त्यांनी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सांगितली. शिवाजी बुधवंत यांनी तात्काळ शहादा पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीमधील संशयीतांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रकाशा ते शहादा रस्त्यावर नाकाबंदी करुन येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांची तपासणी सुरु केली. पोलीसांनी लावलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी दोन
दुचाकीस्वार भरधाव वेगाने येतांना दिसले, म्हणून शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वारांनी वाहन न थांबविता नाकाबंदी चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांनी सदर मोटार सायकल चालकाचा पाठलाग करुन काही अंतरावर थांबविले असता मोटार सायकलवरील एक संशयीत पळून गेला व एका संशयीत दशरथ बुवट्या खडे रा. सातपिप्री ता. शहादा यास्त ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या युनिकॉर्न मोटार सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देवू लागला म्हणून त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने सदरची मोटार सायकल त्याच्या साथीदारांच्या मदतीने 20 ते 25 दिवसापूर्वी रात्रीच्यावेळी शहादा शहरातून चोरी केली असल्याचे सांगितले. त्याबाबत शहादा पोलीस ठाण्याचा गुन्हे अभिलेखावर पडताळणी केली असता शहादा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
सदरचे वाहन कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आले. संशयीत आरोपीतास शहादा पोलीस ठाणे येथे आणून अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथीदार मुरा हिरला रावत रा. अंजनबार ता. सोंडवा जि. अलीराजपूर मध्य प्रदेश याच्या मदतीने शहादा, नंदुरबार, नवापूर, धुळे जिल्ह्यातील साक्री, मध्य प्रदेश राज्यातील इंदौर व गुजरात राज्यातील छोटा उदयपूर येथून देखील दोघांनी मिळून मागील काही दिवसात मोटार सायकल चोरी केलेबाबत सविस्तर माहिती सांगितली.
शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील अलीराजपूर जिल्ह्यात जावून मुरा हिरला रावत रा. अंजनबार ता. सोंडवा यास देखील ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपीतांच्या ताब्यातून 6 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 4 पल्सर, 3 यूनिकॉर्न, 1 FZ, I KTM, I Shine 1 CD-100 अशा एकूण 15 महागड्या दुचाकी जप्त केलेल्या आहेत. जप्त केलेल्या मोटार सायकलबाबत नंदुरबार, धुळे तसेच मध्य प्रदेश व गुजरात राज्यात गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता
शहादा पोलीस ठाणे तीन,नंदुरबार शहर पोलीस ठाणे दोन नवापूर पोलीस ठाणे 1, साक्री पोलीस ठाणे 1, इंदौर मध्य प्रदेश भवरकुंवा पोलीस ठाणे असे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांकडून 6 लाख 90 हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या एकुण 15 मोटार सायकली हस्तगत करून नंदुरबार जिल्ह्यातील 7, धुळे जिल्ह्यातील 1 तसेच मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील प्रत्येकी 1 असे एकुण 10 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड आणण्यात शहादा पोलीसांना यश आले आहे. तसेच उर्वरीत मोटार सायकलींबाबत मुळ मालकांचा शोध घेवून त्याबाबत गुन्हे दाखल आहेत अगर कसे? याबाबत माहिती घेण्यात येत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उप निरीक्षक जितेंद्र पाटील, अभिजीत अहिरे, सहा. पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग राजपुत, पोलीस नाईक योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, किरण पावरा, पोलीस अंमलदार कृष्णा जाधव, अजय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.








