नंदूरबार l प्रतिनिधी
पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलीसांना महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे हस्ते श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.यावेळी सेवानिवृत्त होणारे पोलीस उप निरीक्षक यांची विशेष उपस्थिती होती.
21 ऑक्टोंबर हा दिवस दरवर्षी पोलीस स्मृती दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असतो. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 21 ऑक्टोंबर पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आवारात असलेल्या हुतात्मा स्मारकास आयोजीत कार्यक्रमास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावीत यांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली देण्यात आली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणारे पोलीस उप निरीक्षक श्री. युवराज वाणी यांना कार्यक्रमास विशेष आमंत्रीत केले होते.
21 ऑक्टोंबर 1959 रोजी भारताच्या सीमेवर असलेल्या निर्जन लडाख प्रदेशातील सुमारे 18,000 फूट उंचीवर असलेल्या हॉटस्प्रिंग या बर्फाच्छादित असलेल्या प्रदेशात केंद्रीय राखीव पोलीस दलातील तुकडी गस्त (पेट्रोलींग) करत असतांना चिनी फौजेने अचानक केलेल्या हल्ल्यात तुकडीतील 10 जवान धारातीर्थ पडले. देशासाठी आपले कर्तव्य बजावतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी तसेच वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद पोलीसांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 21 ऑक्टोंबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असतो.
21 ऑक्टोंबर 2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आवारात पोलीस स्मृती दिनामानिमित्त आयोजीत कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावीत यांनी शोक संदेशाचे वाचन केल्यानंतर 1 सप्टेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत भारतात कर्तव्य बजावत असतांना शहीद झालेल्या 189 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे नाव वाचून शहीदांचे स्मरण करण्यात आले त्यानंतर शहीद झालेल्या 189 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील अंमलदारांनी बंदुकीच्या प्रत्येकी तीन गोळ्या हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, श्रेणी पोलीस उप निरीक्षक युवराज वाणी यांच्यासह जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.