शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ध्यान साधना शिबिर नुकतेच संपन्न झाले.
कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या ध्यान साधना शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिमालयन मेडिटेशन समर्पण ध्यान प्रबंधक (मध्य भारत) लीलाधर ठमके, नागपूर हे उपस्थित होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांच्यासह ध्यान साधनाचे क्षेत्रीय व शहादा केंद्राचे आचार्य उपस्थित होते.
लीलाधर ठमके यांनी विद्यार्थ्यांना ध्यान साधनेबाबत प्रात्यक्षिकासह विस्तृत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थी दशेत येणाऱ्या अभ्यासातील अडचणी, स्पर्धात्मक युगात सक्षम व स्थिर मनोवृत्ती ठेवण्यासाठी ध्यान साधनेचे महत्त्व, शरीरातील बदलांना ध्यान साधनेद्वारे नियंत्रित करून जीवनात संतुलन कायम राखणेविषयी विस्ताराने माहिती देऊन व्यसनमुक्त जीवनासाठी ध्यान प्रक्रिया आवश्यक असल्याची माहिती दिली.
यावेळी मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले, वर्तमान स्थितीत ताणतणाव मुक्तीसाठी ध्यान साधना प्रत्येकाला आवश्यक आहे.जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगी तसेच अडी-अडचणींच्या वेळी संयम राखणे आवश्यक असते.यासाठी ध्यान साधनेबाबत माहिती गरजेची आहे.
या ध्यान साधना शिबिर कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सुमारे 130 विद्यार्थी सहभागी झाले होते.








