नंदूरबार l प्रतिनिधी
केंद्र व राज्यातील सरकार बोल घेवड्या योजना घेवून जनतेला भूलथापा देवून दिशाभूल करीत आहेत. अच्छे दिनचे स्वप्न गोरगरीबांना दाखवून सत्तेवर आल्यावर ते विसरले आहेत. आता राज्य सरकारने सरकारी शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेतकर्यांच्या कापसाला योग्य हमी भाव मिळत नाही. दुष्काळाचे संकट आहे. असे असतांना केवळ योजनांची घोषणा करणार्या सरकारकडून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही, असा आरोप उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी केला.
नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे उबाठा शिवसेनेच्यावतीने ‘केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा भांडाफोड करुया, बोल घेवड्या योजनांचा’ या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आ.प्रा.शरद पाटील, आ.आमश्या पाडवी, जिल्हा समन्वयक दीपक गवते, सुनिल सोनार, उपजिल्हा प्रमुख के.टी.गावित, रमेश पाटील, विजय ठाकरे, महानगर प्रमुख पंडीत माळी, कैलास पाटील, छोटू पाटील, प्रमोद पाटील, भक्तवत्सल सोनार, डॉ.हेमंत शर्मा, बापू गिरासे, संजय राजपूत, आनंदा पाटील, गोटू पाटील, चुनीलाल पाटील, दीपक पाटील, राकेश चौधरी, राजू पठाण, योगेश सानप, बाबलू नागरे आदी उपस्थित होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या बोल घेवड्या योजनांवर चर्चा झाली.
आ.आमश्या पाडवी म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात १८ मोठी धरणे आहेत. परंतू त्या धरणातील पाण्याचा जिल्ह्याला फायदा होत नाही. तापी-बुराई योजनेसाठी लढा सुरु आहे. परंतू त्याकडे सरकार लक्ष देत नाही. जिल्ह्यातून जाणार्या तापी नदीवर बॅरेज असूनही त्या पाण्याचा फायदा जिल्ह्या ऐवजी गुजरात राज्याला होतो हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. जिल्हा समन्वयक ि गवते म्हणाले की, केंद्र व राज्याप्रमाणे आता रनाळे ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे रनाळे गावात गेल्या १०-१५ दिवस उलटूनही ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. तापी नदीतून पाणी कधी येणार. ती योजना कधी पूर्ण होणार हा देखील संशोधनाचा भाग आहे. गेल्या २३ वर्षापासून तापी – बुराई सिंचन योजना रखडली आहे, याची खंत त्यांनी व्यक्त केली








