नंदूरबार l प्रतिनिधी
मोलगी येथील मयत युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच इतर दोन मागण्यांसाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली मायमाऊली सह शेकडो ग्रामस्थांनी अक्कलकुवा पोलीस उप अधिक्षक कार्यालया समोर रस्ता रोको आंदोलन करुन तीव्र रोष व्यक्त केला.

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगीचा चनवाईपाडा येथील अल्पवयीन युवतीवर अत्याचार व मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा व इतर दोषींना अटक व्हावी, तसेच याप्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व इतर दोन मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान मोलगी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा.पोलीस निरीक्षक धनराज निळे व सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांच्यावर शिस्तभंगाविषयी चौकशी सुरु असुन अहवालानुसार शिस्त भंगाची कारवाई केली जाईल तसेच सर जे जे रुग्णालयाचा पुनर शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात गळफास दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर योग्य ती करवाई केली जाईल असे लेखी आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दिले.
तसेच सरदार सरोवर प्रकल्पातील 54 शेतकऱ्यांची सिंचन योजनेत फसवणुक झाल्या प्रकरणी पोलीसांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.तर अवैध धंदे पुर्णतः बंद व्हावेत यासाठी दि.16 रोजी पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष हिरामण पाडवी, एकता परिषदेचे किसन महाराज, विद्या पाडवी, छाया वळवी, यांच्या सह मोलगी परिसरातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








