नंदूरबार l प्रतिनिधी
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज झाला असून शेवटच्या टप्प्यात 217 मंडळातर्फे श्रीचे विसर्जन होणार आहे.
28 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यात अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणरायाचे विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात काढण्यात येत असतात.
श्री गणेश विसर्जन मिरवणूक काळात कोणताही अनूचीत प्रकार घडू नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारी म्हणून विविध उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गर्दीचे ठिकाण व इतर महत्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील 37, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-49, उपनगर पोलीस ठाणे- 08, नवापूर पोलीस ठाणे- 32. विसरवाडी पोलीस ठाणे- 01, शहादा पोलीस ठाणे-47, म्हसावद पोलीस ठाणे-12, सारंगखेडा पोलीस ठाणे-10, धडगांव पोलीस ठाणे-05, अक्कलकुवा पोलीस ठाणे-09, तळोदा पोलीस ठाणे-04, मोलगी पोलीस ठाणे 02 असे 161 सार्वजनिक, 45 खाजगी व 11 एक गांव एक गणपती असे एकूण 217 श्रीचे विसर्जन होणार आहे.
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलीस उप अधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 59 सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक, 741 पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस बलाची 1 कंपनी, 600 होमगार्ड, 03 स्ट्रायकिंग फोर्स, 01 शिघ्र कृती दलाची तुकडी असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्वयंस्फूर्तीने पुढे आलेले जवळपास 300 स्वयंसेवकही पोलीसांना विसर्जन मिरवणूकसाठी मदत करणार आहेत.
मिरवणुकीसाठी प्रत्येक विसर्जन मार्गावर ठिक-ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले असून मिरवणूकीदरम्यान ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येणार आहे.
शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे काही समाज कंटकांकडून अनुचीत प्रकार होणार नाहीत यासाठी अशा इसमांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच काही अनूचीत प्रकार आढळून आल्यास त्यांचेविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
जिल्हयात अनंत चतुर्दशीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान डी. जे. डॉल्बीचा व गुलालाचा वापर न करता पारंपरिक वाद्य व जास्तीत जास्त फुलाच्या पाकळ्यांचा वापर करुन दिलेल्या विहीत वेळेत मिरवणुका संपविणे. तसेच विसर्जन मिरवणूक काढतांना इतरांना त्रास होणार नाही किंवा कायद्याचा आदर राखावा असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन करण्यात आलेले आहे.








