नंदुरबार l प्रतिनिधी
प्रत्येक भागातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पुरवून दुर्लक्षित नागरिकांना उभे करण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन कटिबद्ध आहे. घरकुल योजना, बिरसा मुंडा गाव पाडे जोड रस्ता योजना, ठक्कर बाप्पा योजना अशा विविध योजनांचा लाभ पोहोचवून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह प्रत्येक गावात रस्ते विकासाबरोबर सर्व प्रकारचा विकास करण्यावर आपण भर देत आहोत. तेव्हा प्रत्येक नागरिकांनी ग्रामस्थांनी योग्य कागदपत्र पूर्तता करून लाभ घ्यावा; असे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री समर्थ खंडोजी महाराज पारंपारिक नृत्य स्पर्धा संयोजन समितीने आयोजित केलेल्या पारंपारिक नृत्य स्पर्धा कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित हे बोलत होते. संसदरत्न खासदार तथा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ.हिना गावित या अध्यक्षस्थानी होत्या. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या संघांना मंत्री डॉ.विजयकुमार गावित व खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. यावेळी पिंपळनेर मधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संसद रत्न खा.डॉ. हिना गावित यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या या भागातील सर्व गावांच्या विकास व्हावा मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची काटेकोर अमलबजावणी केली जात आहे. मी दिलेल्या आश्वासना प्रमाणे श्री खंडोजी महाराज स्टेडियम आकाराला आले. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नातून आता प्रत्येक गाव पाडयला रस्ते मिळणार आहेत. या भागाचा कायापालट घडवणे हेच आपले ध्येय आहे; असेही खा.डॉ. हिना गावित म्हणाल्या.
दरम्यान, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धे प्रसंगी विविध पथकांनी लक्षवेधी पारंपारिक नृत्यांचे प्रकार सादर केले त्यात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचा मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नंदुरबार येथे पार पडणाऱ्या पुढील रौप्य महोत्सव समारंभात पारंपारिक आदिवासी कला संस्कृती जोपासणाऱ्या कलाकारांचा सन्मान केला जाणारा असून बिरसा मुंडा जयंती महोत्सवात देखील संस्कृती प्रदर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश करण्यात येणारा असल्याचे याप्रसंगी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी घोषित केले.








