नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुसरी प्रकल्पात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार अंतर्गत असलेल्या ल.पा.यो. नवलपुर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असुन सदयास्थितीत पाणी पातळी 159.5 मीटरची नोंद झाली आहे. त्या अन्वये सदर प्रकल्पात 80.25 टक्के पाणीसाठा झाला आहे.
सदर प्रकल्पाची पुर्ण संचय पातळी 159.85 मी असुन पुढील काही तासात धरण आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास व धरणात पाण्याचा येवा वाढल्यास सुसरी धरणाचे वक्रव्दारे उघडून गोमाई नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्याचे नियोजीत आहे. तरी गोमाई नदी काठावरील टेंभली, लोणखेडा, मलोणी, उंटावद, तिखोरा, शहादा, पिंगाणे, धुरखेडा, मनरद, करजई, डांबरखेडा, लांबोळा या गावांना याव्दारे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
वरील प्रमाणे नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडण्यात येवू नये व कोणत्याही मणुष्याने नदीपात्रात जावू नये. तसेच नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तहसिलदार यांनी नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा दयावा व दंवडी देवून नागरीकांना कळविण्यात यावे तसेच पाणी वाढल्यास आवश्यकतेनुसार नदीकाठावरील नागरीकांना स्थलांतरीत करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिला आहे.








