नंदुरबार l प्रतिनिधी
तापी नदीवर सारंगखेडा येथे नवीन पूल बांधला जाणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुलाच्या भरावाचे काम सुरू असून, १५ दिवसांत हलक्या वाहनांसाठी पूल वापरास सुरू करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डाॅ. हीना गावित यांनी नंदुरबारात दिली.
यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पालकमंत्री गावित व खासदार हीना गावित यांनी सांगितले, सोनगीर-शहादा रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक व मध्य प्रदेशला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे तो चारपदरी व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी मंजुरी दिली आहे. रस्त्याचा डीपीआर तयार केला जात असून, सारंगखेडा येथे तापीवर नवीन समांतर पूल तयार करण्यासाठीदेखील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुलाचा भराव वाहून गेलेल्या जागी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
कामाला वेग देण्यात आला असून, येत्या १५ दिवसांत हलकी वाहने या पुलावरून धावू शकतील असे नियोजन आहे. सर्व प्रकारच्या वाहनांना धावण्यासाठी काही काळ लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुलाच्या दुरुस्तीचे काम ॲडव्हान्स स्ट्रक्चरने केले जाणार असून, त्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
पुलाचा भराव वाहून जाण्याचे मुख्य कारण हे बॅरेजची लांबी जास्त व पुलाची कमी आहे. शिवाय बॅरेज ते पूल पर्यंत संरक्षक भिंत बांधली गेली नाही. त्यामुळे बॅरेजचे सर्व दरवाजे उघडल्यास पाण्याचा प्रवाह थेट मातीच्या भरावाला धडकून भराव वाहून जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेवाळी-नेत्रंग महामार्गाचे पहिल्याच टप्प्याचे काम सुरू झाले आहे. त्याला गतीही देण्यात आली आहे. याच महामार्गाअंतर्गत नंदुरबार ते तळोदा हा रस्ता पार पदरी होणार आहे. या मार्गावर वाळूचे ओव्हरलोड ट्रक जास्त प्रमाणात वापरत असल्याने रस्त्यांची वारंवार दुरवस्था होत असते. त्यामुळे हा संपूर्ण काँक्रिटीकरणाचा महामार्ग राहणार आहे. नंदुरबारचा रिंगरोड सध्या तरी होणार नाही, पण आहे तो वळण रस्ता चारपदरी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय हायब्रीड अन्युईटी अंतर्गत डामरखेडा ते बिलाडी सारंगखेडा, देऊरमार्गे दोंदवाडा हा १३६ कोटींचा आणि आमलाड ते ब्राम्हणपुरी व्हाया वैजाली, काथर्दा, भादे, शहादा, लोणखेडा, मोहिदा, कहाटूळ, जयनगर, असलोदमार्गे ब्राम्हणपुरी हादेखील २०७ कोटींचा रस्ता मंजूर करण्यात आला असल्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डाॅ. हीना गावित यांनी सांगितले.








